निर्विण्णानां ज्ञानयोगो, न्यासिनामिह कर्मसु ।
तेष्वनिर्विण्णचित्तानां, कर्मयोगस्तु कामिनाम् ॥७॥
जे कां ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवींहूनि विरक्त ।
जे विधिपूर्वक संकल्पयुक्त । कर्म त्यागित संन्यासी ॥७४॥
ऐशिया अधिकार्यांकारणें । म्यां ’ज्ञानयोग’ प्रकट करणें ।
जेणें कां निजज्ञानसाधनें । माझी पावणें सायुज्यता ॥७५॥
आतां जे कां केवळ अविरक्त । विषयालागीं कामासक्त ।
त्यांलागीं म्यां प्रस्तुत । ’कर्मयोग’ येथ प्रकाशिला ॥७६॥
उंच नीच अधिकारी देख । दोनी सांगितले सविशेख ।
आतां तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारीं ॥७७॥