निर्विण्णस्य विरक्तस्य, पुरुषस्योक्तवेदिनः ।
मनस्त्यजति दौरात्म्यं, चिन्तितस्यानुचिन्तया ॥२३॥
जन्ममरणांचें महाआवर्त । भोगितां वैराग्यें अतिसंतप्त ।
अतएव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥४४॥
मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्पें घातली गरळ ।
तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥४५॥
ऐसेनि विवेकें विवेकवंत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त ।
गुरुनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥४६॥
गुरुनें बोधिला जो अर्थ । तो सदा हृदयीं असे ध्यात ।
चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनःपुनः ॥४७॥
करितां प्रत्यग्वृत्तीं चिंतन । संकल्प विकल्प सांडी मन ।
त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥४८॥
झालिया ब्रह्मसंपन्न । स्वरुपीं लीन होय मन ।
हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥४९॥