जातश्रद्धो मत्कथासु, निर्विण्णः सर्वकर्मसु ।
वेद दुःखात्मकान् कामान्, परित्यागेऽप्यनीश्वरः ॥२७॥
माझे कथेचेनि श्रवणें । उठी संसाराचें धरणें ।
ऐसा विश्वासु धरिला ज्याणें । जीवेंप्राणें निश्चितीं ॥४१॥
म्हणे अर्धोदकीं प्राणांतीं । जैं हरिकथा आठवे चित्तीं ।
तैं उठे जन्ममरणपंक्ती । येथवरी भक्ती मत्कथेची ॥४२॥
ऐशिया भावार्थाचे स्थिती । अनिवार उपजे विरक्ती ।
नावडे कर्माची प्रवृत्ती । विषयासक्ती नावडे ॥४३॥
नावडे इतर कथावदंती । नावडे लौकिकाची प्रीती ।
परी निःशेष त्यागाप्रती । सामर्थ्यशक्ती ज्या नाहीं ॥४४॥
तेणें अनन्यभावें जाण । अत्यादरें करावें भजन ।
येचिविखींचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥४५॥