तवत्कर्माणि कुर्वीत, न निर्विद्येत यावता ।
मत्कथाश्रवणादौ वा, श्रद्धा यावन्न जायते ॥९॥
तंवचि करावा कर्मादर । जंव विरक्ति नुपजे साचार ।
ठाकल्या विरक्तीचें घर । स्वर्ग संसार मळप्राय ॥१००॥
हो कां वमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना ।
तेवीं विषयभोगीं जाणा । साचार मना चिळशी उपजे ॥१॥
तेथ कर्माची परिपाठी । समूळ खुंटली गा गोठी ।
कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥२॥
करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसंडे अंतःकरण ।
विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥३॥
जैसें माझे कथेचें श्रवण । तैसेंचि माझें हृदयीं स्मरण ।
तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥४॥
करितां मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण ।
प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥५॥
(संमतिश्र्लोक) मत्कर्म कुर्वतां पुसां कर्मलोपो भवेद्यदि ।
तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्त्रः कोट्यो महर्षयः ।
(अर्थ) माझी करितां सप्रेम भक्ती । भक्तांचीं नित्यकर्में जैं राहती ।
तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥६॥
एवढें मत्कथेचें महिमान । माझें करितां कीर्तन पूजन ।
तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥७॥
हो कां पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर ।
तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥८॥
कर्में करितां स्वधर्मस्थितीं । उद्धवा आहे माझी प्राप्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥९॥