एकनाथी भागवत - श्लोक ३२ व ३३ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यत्कर्मभिर्यत्तपसा, ज्ञानवैराग्यतश्च यत् ।

योगेन दानधर्मेण, श्रेयोभिरितरैरपि ॥३२॥

सर्वं मद्भक्तियोगेन, मद्भक्तो लभतेऽञ्जसा ।

स्वर्गापवर्गं मद्धाम, कथंचिद्यदि वाञ्छति ॥३३॥

जें पाविजे स्वधर्मकर्मादरें । जें पाविजे निर्बंध तपाचारें ।

जें सांख्यज्ञानविचारें । पाविजे निर्धारें जें वस्तु ॥९२॥

जें पाविजे विषयत्यागें । जें पाविजे अष्टांगयोगें ।

जें वातांवुपर्णाशनभोगें । जें दानप्रसंगें पाविजे ॥९३॥

जें साधें वेदाध्ययनें । जें साधें सत्यवचनें ।

जें साधे अनेकीं साधनें । तें मद्भजनें पाविजे ॥९४॥

हें न सोशितां साधनसांकडें । नुल्लंघितां गिरिकपाटकडे ।

हीं सकळ फळें येती दारापुढें । जैं माझी आतुडे निजभक्ती ॥९५॥

उद्धवा तूं म्हणसी जाण । ऐशी ते तुझी भक्ति कोण ।

ब्रह्मभावें जें गुरुभजन । ते भक्तीचा पूर्ण हा प्रतापु ॥९६॥

सद्गुरुभजनापरती । साधकांसी नाहीं प्राप्ती ।

मी भगवंत करीं गुरुभक्ती । इतरांचा किती पवाडु ॥९७॥

मीही सद्गुरुचेनि धर्में । पावलों एवढिये महिमे ।

त्या सद्गुरुचे गुरु गरिमे । कोणे उपमे उपमावें ॥९८॥

जे गुरुब्रह्म-अभेदभक्त । अवचटें अणुमात्र वांछित ।

तैं वैकुंठादि समस्त । मी त्यांसी देत स्वर्गापवर्ग ॥९९॥

हेंही बोलतां अत्यंत थोडें । मी त्यांच्या भजनसुरवाडें ।

भुललों गा वाडेंकोडें । त्यां मागेंपुढें सदा तिष्ठें ॥४००॥

मद्भक्त नैराश्यें अतिगाढे । ते मागतील हें कदा न घडे ।

तेंही लक्षण तुजपुढें । अतिनिवाडें सांगेन ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP