श्रीकेशवस्वामी - प्रस्तावना

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


श्रीसमर्थ, रंगनाथस्वामी, जयरामस्वामी, केशवस्वामी, आणि आनंदमूर्ति असें हें श्रीरामदासपंचायतन म्हणून त्या काळीं विख्यात होतें.

रंगनाथस्वामी निगडीचे, जयरामस्वामी वडगांवचे, केशवस्वामी भागानगरचे, आनंदमूर्ति ब्रम्हनाळचे आणि श्रीसमर्थ म्हणावे चाफळचे, पण वास्तविक त्रिभुवनाचे. निगडी, वडगाव, ब्रम्हनाळ आणि चाफळ हीं चा‍र्‍ही ठिकाणें साताराप्रांती जवळ जवळ आहेत, त्यामुळें या चौघा महापुरुषांच्या भेटी वारंवार होत. भागानगर लांब पडले, त्यामुळें केशवस्वामींची भेट तितक्या वेळां होत नसे. तथापि चाफळास श्रीरामनवमीच्या उत्सवास ते एकदां तरी आल्याचें वर्णन आढळतें.

परमार्थात हे पाचहि महापुरुष एकजीव झालेले होते, परंतु श्रीसमर्थांनी अंगीकारलेल्या तत्कालोचित ऐहिक कर्तव्यात इतरांचे अंग कितपत होते, याचा पुरावा उपलब्ध नाही. ज्या अर्थी ते इतके एकजीव झाले होते, त्या अर्थी त्यांचे परस्परांस साहाय्य झालें नसेल असें वाटत नाही, फ़क्त तत्संबंधीं पुरावा नाही, इतकेच. धर्मरक्षणार्थ चाललेल्या तत्कालीन राजकारणाच्या उद्योगात श्रीसमर्थांचे अंग उघड असतां आणि या चार-पांचजणांच्या भेटी वारंवार होत, हें सिध्द असतां, त्यांच्यांत राजकारणाच्या, देशपरिस्थितीच्या परस्परांच्या अनुभवाच्या गोष्टी निघत नसतील, हे संभवनीय नाहीं. संशोधन व्हावें तितके अजून झालेंच आहे कोठे ? या पांचहि जणांच्या चरित्रसंशोधनाकडे लक्ष आहे कोणाचे ? जें थोडेंफ़ार संशोधन झालेले दिसतें, अगदीं वरवरचें आहे. मला असा पूर्ण भरंवसा आहे कीं, जसजसें यापुढें निष्ठापूर्वक जास्त संशोधन होत जाईल, तसतसा या पांचहि पुरुषांच्या अन्योन्यसंबंधावर अधिक प्रकाश पडत जाईल.

या पाचजणांपैकीं आनंदमूर्तीचें काहीं काव्यलेखन असल्याचे मला विदित नाहीं. बहुधा तें नसावें. रंगनाथस्वामींच्या पदांचे एक पुस्तक तीस-चाळीस वर्षामागे प्रकाशित झालें होतें. तें पूर्ण होतें असें म्हणतां येत नाहीं व तेंहि आज दुर्मिळ झालें आहे. जयरामांचीहि किती तरी कविता अद्यापि अप्रकाशित असल्याचें मला ठाऊक आहे. केशवस्वामींचीं थोडी पदपदांतरें प्रकाशित होतीं, ती संख्या, कै. धर्मवीर वामनराव नाईकसाहेब यांच्या संग्रही असलेल्या एका बाडाच्या आधारें, नाईकसाहेबांचे सच्छील पुत्र श्री. श्रीधर नाईक यांच्या कृपेने व श्री. नरहरशास्त्री खरशीकर यांच्या संतभक्तिप्रेमाने, प्रस्तुतच्या प्रकाशनद्वारा ८५० वर येऊन ठेपली आहे. पण ती संख्या आणखी किती तरी पटीनें वाढण्यासारखी आहे. श्रीसमर्थवाग्देवतामंदिरातील क्रमांक १७४२ चें बांड ही एक मंदिरातील अपूर्व आणि प्रेक्षणीय वस्तु आहे. त्या बाडाच्या आरंभीच्या २३१ पानांपर्यंत केशवस्वामींचीं पदपदांतरे आहेत व २३२ ते ४४९ पानांपर्यंत त्यांचे नुसते श्लोक २६२१ आहेत. याशिवाय शे-दीडशें बाडांत केशवस्वामींची थोडीफ़ार कविता आहेच आहे. ज्या ग्रन्थाला म्हणून मी ही प्रस्तावना लिहीत आहे, त्याहुनहि कदाचित मोठाच ग्रन्थ होईल, एवढी अप्रकाशित कविता त्या एकंदर बाडांत सहज आहे. ती कोन प्रकाशित करणार आणि केव्हा ? आपल्या महाराष्ट्रांत होऊन गेलेल्या प्रत्येक प्रमुख आणि नामांकित संतकवीच्या नांवाने एक एक मंडळ अस्तित्वांत यावे व त्याने आपल्या वाट्याचें तेवढें एकच काम निष्कामबुध्दीनें अखंड करीत रहावें.

संशोधन जसें संतकविकाव्यांचें करावयाचें, तसेच त्यांच्या चरित्राचेंहि केलें पाहिजे. किंबहुना काव्यांपेंक्षां त्यांचीं चरित्रेच जनतेला जास्त आकर्षक वाटतील आणि उदबोधक होतील. त्यांच्या त्यांच्या हयातींतील चरित्रांचीं साधनें मिळविली पाहिजेत. अशीं साधनें मिळणें कठीण झालें असेल, पण अशक्य आहे, असें मला वाटत नाहीं. असे प्रयत्नच कोणी केल्याचे माझ्या ऐकण्यांत नाहीं. केशवस्वामींचेंच पहा. ते गृहस्थाश्रमी होते, त्यांची पुत्रपरंपरा होती, त्यांनी व्यापहि थोडाथोडका केला नव्हता. तरी पण त्यांच्याविषयींचीं त्यांच्या हयातीतील साधनें मुळींच उपलब्ध नाहींत. ती प्रयत्नांवांचून आपोआप उपलब्ध व्हावीं कशी ? त्यांच्या पश्चात शें-दीडशें वर्षांनीं होऊन गेलेले भक्तलीलामृतकर्ते महिपति व शिरगांवकर भीमस्वामी, दासविश्रामधामकर्ते आत्माराम, भक्तमंजरीमालाकार राजारामप्रासादी इत्यादिकांचे आपणांवर मोठे उपकार आहेत, कीं त्यांनीं या भक्तांच्या लीला, जशा त्यांच्या कानांवर आल्या तशा, लिहून ठेवल्या आहेत. महिपतींच्या ग्रंथांतील ४१ व्या अध्यायांतील पहिल्या अवघ्या ६३ ओव्या केशवस्वामींच्या वांट्याला आल्या आहेत, भीमस्वामींनीं ५ अभंग मिळून ८३ कडवीं केशवस्वामींना बहाल केलीं आहेत, दासविश्रामधामांतील १०४ ओव्यांचा ८७ वा अध्याय त्यांना अर्पिलेला आहे व नाहीं म्हणायला राजारामप्रासादी यांनीच मालेच्या २५, २६, २७ अशा तीन अध्यायांत केशवस्वामींची जरा विस्तृत माहिती दिली आहे. हे चौघेहि चरित्रकार समकालीनच म्हणतां येतील, पण आश्चर्य असें, त्यांच्या त्रोटक वर्णनांतहि एकवाक्यता नाहीं. अशा वर्णनांतूनच स्वामींचें चरित्र पाहणें आज आपणांस प्राप्त आहे. अस्सल साधनांच्या संशोधनाची आवश्यकता तीव्र भासते; असो.

केशवस्वामी मूळचे कल्याणीचे. हे कल्याणीगांव मोंगलाईत नीलंग्याजवळ आहे. शिवरामपूर्णांनंदहि त्याच गांवचे. या कल्याणीगांवाकडे आज जरी कोणाचे फ़ारसें लक्ष जात नाही, तरी एका काळीं ते अनेक सत्पुरुषांचे माहेरघर बनलें होतें. केशवांचे वडील आत्मारामपंत कल्याणीचे कुळकर्णी होते. त्यांच्या मातु:श्रीचें नाव गंगाबाई. मातापिता उभयतां पंढरीचे वारकरी होते व ते नेहमी भगवद्वजनांत रंगलेले असत. पोटीं संतान नव्हतें. फ़ार उशिरा केशव जन्मास आले. पांच वर्षेपर्यंत केशवबाळ बोललेंच नव्हतें. दैववशात श्रीमत आचार्यांचा मुक्काम कल्याणीस झाला, त्यांनी केशवबाळाच्या मस्तकी हस्त ठेवला, कर्णी मंत्र सांगितला आणि केशव बोलूं लागले ते भगवदप्रेमाच्याच गोष्टी सांगूं लागले. श्रीसमर्थांप्रमाणेच त्यांनाहि गाण्याचे अंग अप्रतिम होते. त्याच गांवचे सबनीस श्रीधरपंत नांवाचे होते. त्यांची मुलगी केशवांना दिली होती. केशव प्रपंची होते, पण उभयतां नेहमी भजनकीर्तनांत निमग्न असत. त्यांनीं कीर्तनांत स्वकृत पद्दें म्हणावीं. पद्यांत बाह्यत: शृगाराची छटा असे. असे खरी, असें प्रस्तुतचा ग्रन्थ वाचूनहि दिसते. यामुळेंच केशवस्वामींना गीतगोविंद काव्याचे कर्ते जयदेव यांचा अवतार मानीत. त्यांच्या काव्याविषयीं अभिप्राय देतांना राजारामप्रासादी भक्तमंजरीमालेंत म्हणतात

जगत्रैं जाली कीर्ति । धन्य कृपाळु केशवमूर्ति ।

उध्दरावया यया जगतीं । जयदेव व्यक्ति अवतरली ॥२५॥

पूर्वी शृंगार देवाचा । वर्णितां लाचावली वाचा ।

तोचि अभ्यास पडता साचा । अनुकार कवनाचा तोचि पै ॥६६॥

अध्यात्मयुक्त शृंगारिक । भाषण जयाचें नेमक ।

जाहलें काव्य तेंचि चोख । प्रसादिक सकळ जना ॥६७॥

याच्याच पुढच्या अध्यायांतहि केशवांच्या कवनाचें स्वरुप आणि विस्तार हीं सांगतांना मालाकार म्हणतात

नाना प्रकारें करुनि कवन । तोषविला नारायण ।

परी स्वभाव मुळींचा पूर्ण । शृंगारवर्णन जयामाजी ॥

निबिड ज्ञान शुध्द वेदांत । जेथील विलास तो अद्वैत ।

ऐसी पदें असंख्यात । केशवसमर्थे केलीं पै ॥८८॥

त्यांच्या कीर्तनात देवाच्या गळ्यांतील हार त्यांच्या गळ्यांत येऊन पडावा, भिंतीवर काढलेल्या चित्रांतील राधेनें श्रीकृष्णास विडा द्यावा, तो श्रीकाष्णानें प्रत्यक्ष चघळून त्याचा रस भिंतीवरुन गळत असलेला सर्वांच्या नजरेस पडावा, कीर्तनाच्या शेवटीं प्रसाद म्हणून चुकून सुंठेच्या ऐवजी बचनागाचे विष सर्रास वांटण्यात येऊन कोणासहि त्याची बाधा न होतां देवाच्या मूर्तीवर त्याचा परिणाम व्हावा, इत्यादि अनेक चमत्कार इतरांप्रमाणे त्यांच्याहि चरित्रांत घडल्याचें नमूद आहे. त्यांवर आपापल्या बुध्दीप्रमाणें कोणी विश्वास ठेवावा किंवा ठेवूं नये. पण ज्या चमत्कारावर सर्वांनी विश्वास ठेवावा असें मी म्हणूं शकेन, असा एक चमत्कार, थोड्या फ़ार फ़रकानें सर्व चरित्रकारांनी सांगितला आहे, तो असा:- एकदां केशवस्वामी नदीवर स्नानास जात असता, एकदां, एका चरित्रकाराच्या मतें एका शेतकर्‍याच्या नजरेस व दुसर्‍याच्या मतें एका अविंधाच्या नजरेस केशवस्वामींच्या खांद्यावर बालकृष्णाची गोजिरी मूर्ति आरुढ झालेली दिसली ! हें मी शक्य मानतों, कारण मी असें मानणारा आहे कीं, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येक मनुष्याची काळजी वाहणारीं " देव, देवता, देवतें, भूतें " त्याच्याभोवतीं अहोरात्र असतात !

प्रस्तुत ग्रन्थाच्या ८४९ व्या पद्यांत श्रीसमर्थ आणि केशवस्वामी यांच्यांत झालेला पत्रव्यवहार दिलीला आहे, तो उभयतांच्या चरित्रांत प्रख्यात आहे आणि तो सर्वथैव विश्वसनीय आहे. तसेच पृष्ठ १४० वर जें ४७८ वें पद आहे तें समर्थांना उद्देशून केशवस्वामींनी आपल्या शिष्यांस सांगितलें होंतें, असा समज आहे. तेव्हा अशा अर्थांची एकादी टीप त्या पदावर हवी होती.

केशवस्वामींचा जन्मकाळ ठाऊक नसावा, हें दुर्दैव होय. त्यांचा निर्वाणकाळ रा. लक्ष्मणराव पांगारकर, मराठी वाड्गमयाच्या इतिहासाच्या तिसर्‍या खंडांत " केशवस्वामींनी शके १६०८ मध्यें समाधि घेतली. कोणी हा शक १६०४ देतात " असा देतात . भक्तमंजरीमालाकार

शके सोळाशे चार । दुंदभि नाम संवत्सर ।

पौषमास गुरुवार । त्रयोदशसार उत्तम तिथि ॥२७

असा देतात.

केशवस्वामींची समाधि हैद्रबादेस मुसानदीच्या कांठी आहे. ती आम्हीं शके १८२७ च्या पौषांत पाहिली होती. समाधि पाहिली होती म्हणजे काय पाहिलें होतें ? चौफ़ेर मुसलमानांच्या मालकीच्या झालेल्या शेतांत एक चारपांच फ़ूट उंचीचा कोनाडा बांधलेला होता व आंतील जागा उखळलेली होती ! आज तिची काय अवस्था आहे, ठाऊक नाहीं, बहुधा तशीच असेल ! भोंवतालची जमीन पूर्वी समाधीकडेच होती म्हणतात, पण कोणी पर्वा न केल्यामुळें ती आज दुसर्‍यांची झाली आहे. पण पूर्वीची कथा अशी आहे: एका पीराचा दृष्टान्त झाल्यावरुन त्या देशींच्या व्याधिग्रस्त यवनाधिपतीनें केशवांच्या समाधीचें भक्तिभावानें दर्शन घेतल्यावरुन

तेणें रोग तात्काळ गेला । यवनाधीप संतोषला ।

प्रात:काळचे नैवेद्याला । नवस अर्पिला मिठाईचा ॥

तेव्हांपासुनी अद्यापि वरी । मिठाई चालत आहे निर्धारी ।

जकातीचे मालतीवरी । नेमणूक सारी केली ते ॥

इत्यादि वर्णन मालाकारांनी केलें आहे. मालाकारांना होऊन शंभर सवाशें वर्षें झालीं. तोंपर्यंत समाधीची सुस्थिति होती. पण आज तिची कोण दुर्दशा झाली आहे ! केशवस्वामींना या स्थितीचें सुखदु:ख काय असणार ? पण आपल्या मनाला वाईट वाटतें तें त्यांच्यासाठी नसून आपल्याचसाठीं होय. साधूचा देह जेथें शेवटीं पडतो ती पुण्यभूमि समजली पाहिजे. तिचें दर्शन आपणांस घडावें व तेंणेंकरुन आपल्या मनावर परिणाम व्हावा, म्हणून अशा भूमीचें रक्षण करावयाचें व पावित्र्य राखावयाचें. हैद्राबादेच्या व इतर ठिकाणच्या महाराष्ट्रीयांचे या स्थितीकडे लक्ष जावें, अशी प्रार्थना आहे.


References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP