श्रीकेशवस्वामी - भाग ८

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद १८१ वें

तुझ्या पोटासि येइन देवा ॥ मन मारूनि करिन सेवा ॥ध्रु॥

माझें इतुकेंचि आर्त आहे ॥ ॥ आर्तबंधु तूं पुरविशी माय ॥१॥

पोटा येउनि घेइन भेटी ॥ घेउनि नांदेन पोटीं ॥२॥

केशा म्हणे मी सांगो किती ॥ तूं सर्वज्ञ आनंदमूर्ती ॥३॥

० पद १८२ वें

अविद्येचें सैन्य आलें । तेणें मजला वेढीयलें ॥ध्रु॥

तेव्हां धांवणे याणें केलें हा रामचंद्र । कृपाळू सखा ज्ञानइंद्र ॥१॥

कामक्रोधें मजला पीडीलें ॥ संसार शत्रुनें छळिलें ।तयाचें निर्मुळ यानें केलें ॥२॥

मोहानें भुलविलें पाही । शोक थडका हाणे हृदयीं ॥ मारिलें तयासी यका घाई ॥३॥

लोभ गर्व आलें बळी । द्वेषानें मांडिली फळी ॥ तत्काळ तयाची केली होळी ॥४॥

अभिमानानें पेटला मारा । बोधाचा मोडला थारा ॥

तेवेळीं पावला कैंवारा ॥५॥ पाठीसी घालुनी मातें । रक्षिलें अनाथनाथें ॥

म्हणे केशव वोवाळु जीवें यातें ॥६॥

० पद १८३ वें (धाट -धुम)

जेथें जावें तेथें देव सांघातें ॥ एैसें केलें येणें श्रीगुरुनाथें ॥ध्रु॥

देवासी सांडुनी जावें मी दूरी ॥ तंव देव रिघाला मजभीतरीं ॥१॥

देवाभेणें बैसलों कपाटीं ॥ तंव तो देव भरला पाठीं पोटीं ॥२॥

देवावीण ठाव न दिसे रिता ॥ सबाह्य देवची झाला तत्त्वता ॥३॥

गुरुकृपें केशवीं घेतली पाठी ॥ आपला करूनी ठेला संवसाठी ॥४॥

० पद १८४ वें

यथार्थ आपुलें स्वरूप नेणोनी ॥ सैरा धांवती मी देह म्हणोनी ॥ध्रु॥

पिसाळले जन पिसाळले रे ॥ मुद्दल आपणा हारवीलें रे ॥१॥

आहे ते सांडोनि नाहीं तें पाहे ॥ नागवीले परी न धरी सोय ॥२॥

केशव म्हणे धरा गुरूची आवडी ॥ दीर्घ पीसें तो बाप

माझा काढी ॥३॥

० पद १८५ वें (राग -कांबोध)

त्याचें नाम विसरो कैसें आतां ॥ जेणें माझा घेतला भार माथां ॥ध्रु॥

रूप त्याचें पाहीन धनीवरी ॥ पाय त्याचे वंदीन नित्य शीरीं रे ॥१॥

भवार्णवापासुनी सोडवीलें ॥ ब्रह्मानंदसागरीं बुडवीलें रे ॥२॥

केशव प्रभु कृपाळु महाराज ॥ माझी त्याविण कोण्हासि नाहीं लाज रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP