श्रीकेशवस्वामी - भाग ९

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद १८६ वें

आत्माराम न दिसे नयनीं । तरी हें जिणें कासयालागुनी ॥ध्रु॥

जानकी म्हणे त्रिजटे माय वो । केव्हां देखेन रामाचे पाय वो ॥१॥

अजुनि राम नयनिं कां दिसेना । वियोग मज रामाचा साहे ना ॥२॥

केशव प्रभु दाखवि लवलाह्या । क्षेमेलागीं उदित या बाह्या ॥३॥

० पद १८७ वें

त्रिभुवन-जनकाचें मानसिं चिंतिन रूप साचें ॥

मीपण माझें विसरूनि केवळ भोगिन सुख त्याचें ॥ध्रु॥

आनिक मानेना मज वो, आनीक मानेना ॥

राम रमापतिविण मति माझी भवरति जाणेना ॥१॥

सकळहि श्रृंगार वो वाटत बहुभार ॥

प्राणसखा हरी झडकरी कैं तो भेटेल साचार ॥२॥

केशव स्वामी वो नांदत अंतर्यामीं वो ॥

तत्० पदीं तन्मय होऊनि राहिन मंगळधामीं वो ॥३॥

० पद १८८ वें

वियोग साहवेना मज वो हरिविण राहवेना ॥

मायिक दुःखरूप प्रपंच याकडे परतुनि पाहवेना ॥ध्रु॥

झडकरि आणा वो राजस पंढरीराणा वो ॥

पंचहि प्राण व्याकुळ माझे हरिविण जाणावो ॥१॥

चंदन पोळीतो बहु हा शशांक जाळीतो ॥

हृदय-कमळदळीं देखेन केव्हां निज वनमाळी तो ॥२॥

अनाथ-दिनबंधु आत्मा विठ्ठल सुखसिंधु ॥

केशव म्हणे वो आम्हा त्याचा अखंड निजछंदु ॥३॥

० पद १८९ वें

आवडि लावुनियां निजनामीं ॥ नांदवि मंगळ धामीं ॥ध्रु॥

झडकरि दावा तो मजलागीं ॥ प्राणविसांवा योगी ॥१॥

नासुनि माया हे ममताक्षी ॥ निजसुख देउनि रक्षी ॥२॥

अंतर्यामीं तो निर्नामी ॥ केवळ केशव स्वामी ॥३॥

० पद १९० वें

हृदयकळींचा निजरावो ॥ उपाधि जेथें वावो ॥ध्रु॥

सत्वर स्वामी तो मज दावा ॥ लग्न तयासी लावा ॥१॥

गाजावाजा हा न करावा ॥ श्रवणी रंजनि द्यावा ॥२॥

समय कोंडुनि हा भव खाडा ॥ तोचि करा मज जोडा ॥३॥

त्रिभुवनधर्ता तो श्रमहर्ता ॥ केशव म्हणे सुखकर्ता ॥४॥

० पद १९१ वें (राग - काफी)

भ्रांती पडदा फेडा माझा स्वामी मज तुम्ही दावा गे ॥

त्रिविधतापें श्रमलें जीवींचा विसांवा मेळवा गे ॥ध्रु॥

चंदन पोळ शशी बहु जाळी दारुण विरहानळीं गे ॥

हरिवीण दीशा दिसती उदासा भेटवा गोपाळ गे ॥१॥

सुमनहार जाले विखार वेगिं परते काढा गे ॥

हरिविण रस हे सकळही विरस, शोभा कैंची जडा गे ॥२॥

करमुद्रिका वस्त्रें देखा भूषण करूं मी काय गे ॥

काढा पैंजण वाजति रुणझुण हरिविण मात न साहे गे ॥३॥

आसन, शयन, भोजन, पान जाहलें विषप्राय गे ॥

नघला वारा, होतो उबारा, हरिविण प्राण जाय गे ॥४॥

हरिविण कळा विकळ सकळा विरस हा सेजार गे ॥

सद्गुरु शरण रिघतां, केशवीं जाला साक्षात्कार गे ॥५॥

न गमे न गमे मज हरीविण बाई ॥ध्रु॥

गृह, सुत, धन हें तो नाठवेचि माते ॥ गोविंदें मोहिलें करूं काई वो ॥१॥

जीवींचा जीवन तो मदनमोहन वेगीं । भेटवा हरी शेषशाई वो ॥२॥

केशवाचा स्वामी झडकरी मेळावा । तो निववील ठाईंच्या ठाईं वो ॥३॥

० पद १९३ वें

आजि गोविंदु सेजारासी आणा वो । हरिविण क्षणभरि न गमोचि मातें भेटवा वेगिं यदुराणा वो ॥ध्रु॥

सेज विरस झाली सुमन सुकोनी गेलीं ॥

शीणलें नयन वाटें पहातां वो ॥१॥

गोपाळराज येईना तरी सर्वथा जीना ॥

वेगीं मेळवा कमळनयन कान्हा वो ॥२॥

केशवाचा स्वामी आणा अंतर्यामीं ॥ मन व्याकुळ झालें कृष्णा कामीं वो ॥३॥

० पद १९४ वें

गोविंद पहातां नयनीं ॥ गोविंद दिसे ध्यानीं मनीं ॥ जन-वन-वीजनीं गोविंद दिसे ॥ध्रु॥

गोविंदाचा वेध वो । नवल माय छंद वो ॥ अवघा गोविंद वो ॥ अखंड दिसे ॥१॥

गोविंद पाहे जेथें तेथें ॥ गोविंदचि सांघातें ॥ गोविंदावांचुनि रितें ॥ उरलें नाहीं ॥२॥

गोविंदे लाविलें पिसें ॥

काय मी सांगो कैसें ॥

केशवीं सर्वत्र भासे ॥ सर्वांगी सदा ॥३॥

० पद १९५ वें बलंदी

सुख जालें सुखा । राम लुटा फुका ॥ध्रु॥

हे लुटी मोटी पाहीं । घेणार कोणी नाहीं ॥१॥

ज्ञान गर्वे जातां । हें लुटीन या हाता ॥२॥

केशव म्हणे उठा । तुम्ही संतसंगें लुटा ॥३॥

० पद १९६ वें

त्रिभुवनचाळक, मुनिजनपाळक, बाळक नंदाचा ॥

अनंत गुणनिधी, दिन दया-कर, तारक विश्र्वाचा ॥ध्रु॥

कमळावल्लभ, हरि तो माझ्या नयनीं दावा गे ॥

त्याविण न गमे क्षणभरि लवकरि आणुनि द्यावा गे ॥१॥

वियोगबाणें जर्जर माझें शरीर जालें वो ॥

मदनजनक तो न भेटतां मज मरणचि आलें वो ॥२॥

भवभय-मोचन, राजिवलोचन, देव सनातन वो ॥

केशव म्हणे दृढ इच्छित आम्ही तत्० पदिं दरशन वो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP