श्रीकेशवस्वामी - भाग २३

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ५६७ वें

हात ठेवुनियां कटी । उभा भीमरेच्या तटीं ॥ध्रु॥

बाप माझा दीनानाथ । वाट भक्तांची पहात ॥१॥

मुकुट कुंडलें वनमाळा । रूपें सुंदर सांवळा ॥२॥

म्हणे केशव भेटावया । सदा उभारिल्या बाह्या ॥३॥

० पद ५६८ वें

थोर भक्तीचा कळवळा । वाट पाहे वेळोवेळां ॥ध्रु॥

निजभक्ताचिया लोभा । युगें अठ्ठावीस उभा ॥१॥

केव्हां येतील वारकरी । क्षेम देइन म्हणे हरी ॥२॥

म्हणे केशव नवल जाणा । भक्तीं मोहिला वैकुंठराणा ॥३॥

० पद ५६९ वें

दुरी दुरी बहुत दुरी । पाहतां हृदयाभीतरीं ॥ध्रु॥

माझा सांवळा श्रीहरी । उभा ध्यान विटेवरी ॥१॥

समकर कटावरी । सम देखणा निर्धारी ॥२॥

ज्ञान चंद्रभागातीरीं । ब्रह्मानंद पंढरपुरीं ॥३॥

म्हणे केशव मज भेटला । अंगि भेदेंविण दाटला ॥४॥

० पद ५७० वें

काशी न पवेची सरी । दुजें वैकुंठ पंढरपुरीं ॥ध्रु॥

कां रे नव जाती ये वाटे । जेणें भावें विठ्ठल भेटे ॥१॥

दिंडी पताकाचे भार । संत करिती जयजयकार ॥२॥

म्हणे केशव नामासाठी । मोक्षें लुटे वाळुवंटीं ॥३॥

० पद ५७१ वें

योगयाग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥ध्रु॥

जळो त्याचें जालेपण । न देखेची समचरण ॥१॥

तीर्थें केली कोटीवरी । नाहीं दखियली पंढरी ॥२॥

केशव म्हणे विठ्ठलपायीं । सर्व तीर्थें घडती पाहीं ॥३॥

० पद ५७२ वें

चंद्रभागेसी स्नान केलें । विश्र्वीं विठ्ठलदर्शन झालें ॥ध्रु॥

विठ्ठल देखीला सांवळा । जगजीवन जगजिव्हाळा ॥१॥

पाहतां विठ्ठलाचें रूप । मन जालें हो तद्रूप ॥२॥

गुरुकृपें केशवीं खूण । देह विदेहीं विठ्ठल पूर्ण ॥३॥

० पद ५७३ वें

दृष्टि घालोनिया हो मुळीं । आत्मा विठ्ठल तूं न्याहाळीं ॥ध्रु॥

पाहे विठ्ठल उघडा डोळां । स्वानुभव सुख-सोहाळा ॥१॥

सर्वीं सर्वत्र विठ्ठल पाहीं । दुजें कल्पुं नको तूं कांहीं ॥२॥

गुरुकृपें केशवी भेटी । जाली विठ्ठलासी सवसाठीं ॥३॥

० पद ५७४ वें

नानापरिचीं विचित्रें । भिंती वेगळीं नव्हतीं चित्रें ॥ध्रु॥

तैसा पंढरीचा राणा । जग अवघें आपण जाणा ॥१॥

तरंगाचेनि विभागें । स्वयें जळचि नांदे आंगें ॥२॥

गुरुकृपें केशवीं भेदू । नाहीं अवघाचि गोविंदू ॥३॥

० पद ५७५ वें

उदीमाचा करुनी झाडा । कर्म कतबा अवघा फाडा ॥ध्रु॥

मग येणें जाणें नाहीं । पुढें व्यवहार नलगे कांहीं ॥१॥

व्याज मुद्दल देउनि उजू । तिहीं लोकीं व्हावे ऋृजू ॥२॥

केशव म्हणे लिगाड तोडा । सुख-सागर विठ्ठल जोडा ॥३॥

० पद ५७६ वें

विठ्ठल सोयरा निजाचा । निजहृदयीं नांदे साचा ॥ध्रु॥

त्याची प्रीति लागली पाहीं । वृत्ति रंगली त्याचिया पायीं ॥१॥

विश्र्वीं विठ्ठल स्वयंप्रकाश । अवघा विठ्ठलचि अविनाश ॥२॥

केशविं दरुशन सावकाश । कारण अपुलाचि विश्र्वास ॥३॥

० पद ५७७ वें

आत्मा विठ्ठल मजसांघातें । नाठवितां भासे मातें ॥ध्रु॥

आतां कवणीकडे म्यां जावे । विश्र्व व्यापिलें विठ्ठलदेवें ॥१॥

ठाव विठ्ठलावांचुनि रिता । नाहीं त्रैलोकीं तत्वतां ॥२॥

यक सर्वत्र विठ्ठल रावो । म्हणे केशव फळला भावो ॥३॥

० पद ५७८ वें

येणें विठ्ठलें मोहन केलें । माझें मीपण चोरुनि नेलें ॥ध्रु॥

रूप आपलें मज दावीलें । सुख-स्वरूप मजला केलें ॥१॥

नाम-रूपातीत बोधें । जन नांदवीलें अभेदें ॥२॥

म्हणे केशव नवल जालें । पाहतां पाहतेपणही गेलें ॥३॥

० पद ५७९ वें

जें मी कर्म आचरूं जाय । तेथें माझाचि विठ्ठल पाहे ॥ध्रु॥

विठ्ठल सोयरा सांघातें । परिपूर्ण जेथें तेथें ॥१॥

विठ्ठल माता विठ्ठल पिता । विठ्ठल आत्माचि तत्वतां ॥२॥

सम विठ्ठल सर्वां ठायीं । म्हणे केशव दुसरें नाहीं ॥३॥

० पद ५८० वें

भवपाशीं गुंतलों करूं काय रे । पांडुरंगा दावी तुझे पाय रे ॥ध्रु॥

देवराया, कमळ-दळ-लोचना । पाव वेगीं त्रिविधताप-मोचना ॥१॥

पुडरीकवरद-मूर्ती राजसा । दयासागरा, तुझा मज भरंवसा ॥२॥

दीनोद्धारा सकळ सुखदायका । केशवस्वामी त्रिभुवननायका ॥३॥

० पद ५८१ वें

भक्त-चूडामणी देव चक्रपाणी । आठवीतां धुनी सर्व पापां ॥ध्रु॥

पाप नाहीं आम्हां पुण्य तेंही नाहीं । विठ्ठलाचे पायीं मुक्त जालों ॥१॥

सखा चक्रधर राम रमावर । चिंतीतां दुस्तर भवाब्धी तरलों ॥२॥

केशव म्हणे सुखी जालों परोपरी । विठ्ठलें अभ्यंतरीं सांठवीलें ॥३॥

० पद ५८२ वें

पुंडलीकें पेठ रचियेली बरी । त्रिभुवनीं विख्यात निजपंढरी ॥ध्रु॥

नाना भारे पसारे भीमरातीरीं । मांडियलें संती स्वानंद करीं

धन्य धन्य पुंडलीक व्येव्हारा भला । परलोकिंची वस्तु येथें

घेउनि आला ॥

सुखाचा सुकाळ डोळियां केला । तन-मन-प्राणें यासी वोवाळा

वैकुंठ नाही जे कैलासी नाहीं । ते वस्तु पंढरी आणिली पाहीं ॥

उभी केली विटेवरी निजविठाई । आपुलाले मापें तुम्ही घ्यारे लवलाहीं ।

वैकुंठ श्रवणीं ऐकिलें बंदर तेही केलें । द्वारका निजसुख जेथें कोंदाटलें ॥

नित्यनवा आनंद पंढरपुरीं । वस्तुचि घडामोडी निरंतरी॥

सांठविती आनंद घरोघरीं । राया-रंकासी तेथें समसरी ॥

सनकादिक घेती आपुल्या मापें । पंढरपुरीं तें आम्हांसी सोपें

थोर उपकार केला पुंडरीकबापें । केशव म्हणे अमर झालों याचिया खेपे ॥

० पद ५८३ वें

संसारसागरीं नाव पंढरी । नावाडी तेथें आत्मा श्रीहरी ।

शरणागतांसी वांउनी माझारी । क्षणामाजीं पैलपार उतरी ॥ध्रु॥

जयजय स्वामी विठ्ठल वीरा । देवाधिदेवा रुक्मिणीवरा ।

त्रिभुवन-तारक सर्वेश्र्वरा । दीन जनांसी तूं निज सोयरा ॥१॥

सा च्यारीं आठरा आले नावें । ते अखंड जडले प्रेमप्रभावें ।

अनंतभुजीं नांव धरीयलें देवें । उतरीं तूं दासालागीं प्रेमगौरवें ॥२॥

विश्र्वास सडें एक लाविलें कासें । येका भजनाचे पेटें देउनी तारिलें कैसें ।

महाराजांसी उबग नसे । अद्यापि तारावया उभाचि असे ॥३॥

श्रवण-कीर्तन-स्मरणें तारी । आत्मनिवेदन नवविद्धु

होडी तारी ॥४॥

असा स्वामी कृपाळु तारक पाही । तारितां साना थोर मानी कांही ।

केशव म्हणे शरण रिघा याचिया पायीं । तारील महाराज येथें संदेह नाहीं ॥५॥० पद ५८४ वें

ध्यानासी ना कळे रे । जें ज्ञानासी न कळे रे ॥ध्रु॥

तें या विठ्ठलाचें स्वरूप रे । पाहतां सहजचि अमूप रे ॥१॥

जे योगासी सांपडेना । शेखीं बोधासी आतुडेना ॥२॥

ऐसें केशवानें पाहिलें रे । तेथें पाहणेंचि राहिलें रे ॥३॥

० पद ५८५ वें

दृष्टीं उपनेत्र लावुनि वेगें । द्रष्टा विठ्ठल पाहे निजांगें ॥ध्रु॥

कां रे भुललासी गव्हारा । होय विठ्ठलासी सामोरा ॥१॥

श्रोत्र बिल्ल हें जाणोनि वेगें । श्रोता विठ्ठल पाहे निजांगें ॥२॥

रसना चामडी जाणोनि वेगें । भोक्ता विठ्ठल पाहे निजांगें ॥३॥

घ्राणरंध्र हें जाणोनि वेगें । घ्राता विठ्ठल पाहे निजांगें ॥४॥

त्वचा चामडी जाणोनि वेगें । स्पर्श विठ्ठल पाहे निजांगें ॥५॥

केशव गुरुकृपें जाणोनि वेगें । देह भिताडें राहील माघें ॥६॥

० पद ५८६ वें

सांडुनियां विठाबाई । काय पुजाल मेसाई ॥ध्रु॥

आदिमाता रे विठाई । यारे लागों इच्या पाईं ॥१॥

आई जोगाई तुकाई । इजपुढें बापुडी काई ॥२॥

केशव म्हणे माझी आई । तिन्ही लोकांसी इची साई ॥३॥

० पद ५८७ वें

तिन्ही लोकांची साउली । दीनजनाची माउली ॥ध्रु॥

विठाबाई माझी आणा । प्राण तिजविण जातो जाणा ॥१॥

जालों तिजविण मी परदेशी । तिसी पुसा कैं तूं येशी ॥२॥

केशवाची स्वामिन अंबा । स्वयंभू तिची शोभा ॥३॥

० पद ५८८ वें

हरी देवाचा देव जाणा । आदिपुरुष पंढरीराणा ॥ध्रु॥

सर्व देव यावरून । सांडीयले ओवाळून ॥१॥

बंदी पडल्या देवकोडी । त्यांचा बंद हा रे सोडी ॥२॥

केशो म्हणे पाहतां काय । या रे धरूं याचे पाय ॥३॥

० पद ५८९ वें

विठ्ठलाचें नांव साचें निजधन पाहीं । विठ्ठलस्मरणाहुनी अति सुख नाहीं ॥ध्रु॥

अमळ कमळनयन विठ्ठलराजा । प्राणविसांवा हा गोविंदू माझा ॥१॥

विठ्ठल देवाधिदेव विठ्ठल साधूंचा राव । विठ्ठलस्वरूपीं वाव भेदू जाला ॥२॥

विठ्ठलदर्शनें माय सर्वही विठ्ठल आहे । केशव तन्मय राहे अद्वयबोधें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP