श्रीकेशवस्वामी - भाग १५

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ३९६ वें

देव गळेपडू भक्त हा झोडू । दोघांसी पडिपाडु सारखाची ॥ध्रु॥

देव निलाजिरा भक्त निलाजिरा । न दीसे अंतरा दोहोंमाजी ॥१॥

देव घरघेणा भक्त हा बुडवाणा । एकाचे मुळीं एक बैसले जाणा ॥२॥

गुरुकृपें केशवीं देवभक्ता मीठी । येरा येरांपोटीं सामावले ॥३॥

० पद ३९७ वें

मारूनियां मन उन्मन केलें । तारूनियां जीवपणची नेलें ॥ध्रु॥

शरण रीघा त्यासी शरण रीघा । उरोंचि नेदी जो भेदलिंगा ॥१॥

देउनियां भेटी दाविलें आप । भक्त केला जेणें देवाचा बाप ॥२॥

केशव म्हणे तो आमुचा स्वामी । त्याच्या पायीं आम्ही नाहीं तुम्ही ॥३॥

० पद ३९८ वें

सबाह्यअंतरीं देव निरंतरीं । येक चराचरी नांदतसे ॥ध्रु॥

देवावीण दुजें आणु न दिसे कांहीं । जेथें तेथें पाही देव दीसे ॥१॥

नाना व्यक्तीरूप सृष्टी हे अमूप । तें देवाचें स्वरूप जाणा तुम्ही ॥२॥

सहज सर्वगत देवची निश्र्चित । भिन्नभिन्न तेथ बोलों नये ॥३॥

गुरुकृपें खूण केशवीं परिपूर्ण । देह विदेही संपूर्ण देव दिसे ॥४॥

० पद ३९९ वें

दंडवतालागीं सन्मुख जालें । तंव बळेंचि आलिंगन दीधलें ॥ध्रु॥

हृदयामाजीं निज घालुनि स्वयें । स्वरूपीं वेडावलें ग माय ।

सद्गुरु हा देव लाघवी कैसा । बोलिजेसें ऐसा नाहीं ग माय ॥१॥

येणें कानीं गोष्टी सांगोनि मी ठकीलों । मज पूज्यपणा

मुकवीलें ग माय ।

मस्तकीं हातु ठेवितांचि कैसें । यकपण तेंही नेलें ग माय ॥२॥

येणें आपुलें निजरूप डोळां दाविलें । मीमाजीं मज उगवीलें ग माय ।

माझें मज कैसें पाहतां विस्मयो । ठकचि पडोनि ठेलें ग माय ॥३॥

बोलतां नये बोलें येणें ऐसें केलें । मौन्यासीही मौन्य पडीयलें ग माय ।

सुखासही निजसुख भेटवुनि सुख । ठाइंच्या ठायीं निववीलें ग माय ॥४॥

सद्गुरुकृपें केशवीं पाहतां । कैसा नवलाव वीतला थोरू ग माय ।

गुरु शिष्य दोनी कल्पना गिळोनी । सबाह्य नांदे तो गुरु ग माय ॥५॥

० पद ४०० वें

येवढा पहा हो ब्रकम्हविद्याउ० पदेश । स्वयंभप्रकाश प्रकाशला ।

मस्तकीं हात ठेवितांचि क्षणीं । शिष्य तो गुरुरूप केला ग माय ॥ध्रु॥

काय सांगों याची नवलपरी । बोलावया कांही नुरेचि उरी ।

परिसाचेनि संनिधानें लोह पालटे होय सोनें । परी तें वेगळेपणें

उरलें असे ॥१॥

तैसी याची कृपा नव्हे ग माय । आपणाचि ऐसें करुनी ठेला ॥१॥

आपणाऐसें केलें हेंही बोलणें ठेलें । स्वरूपीं मीनलें स्वरूपेंसी ॥२॥

सरिता गंगेच्या मीलनीं निवडीतां नये पाणी । केशवीं गुरुचरणीं यापरी ग माय ॥३॥

० पद ४०१ वें

शरण दयानिधि तुजलागीं रे शरण ।

शरण येउनियां भवसारग तरलों । लावुनि कामभुवनासी आगी ॥ध्रु॥

भजनपरें अतिकरणेंहि करुनि । हृदयिं धरुनि तुज राहिलों देवा ॥

देव-भक्त-धर्म विसरलों म्हणवुनि । पावलों अद्वय तव० पद ठेवा ॥१॥

त्रिभुवननायक गतिदायक तूं । तुजविण आणिक मंगळ नेणें ॥

केशवस्वामी मज पूर्ण सुखी केलें । सिद्ध सनातन स्वरूपप्रदानें ॥२॥

० पद ४०२ वें

स्वामी तो मायबाप निजाचा । हृदयस्थ निज जीव जिवाचा रे ॥ध्रु॥

सोयरा जिवलग सखा रे । दर्शनें देत निजसुखा रे ॥१॥

आंठवी तो कां अंतरी भासे । नाठवी तरी तोचि प्रकाशे ॥२॥

अनुभवें नित्य हृदया येतो । केशवीं प्रेम सबाह्य देतो ॥३॥

० पद ४०३ वें

आजि निजप्राप्ति-पूर्णिमा । प्रकटला तेथें ज्ञेय-चंद्रमा ॥ध्रु॥

जाला रे परिपूर्ण प्रकाशु । हरपला मायातम-भासू रे ॥१॥

चांदीने सहजाचें पडीलें । विश्र्व हें तेणें तेजें घडीलें रे ॥२॥

केशवीं निजप्रकाश पाहीं । कोंदला सिद्ध सकळां ठाईं ॥३॥

० पद ४०४ वें (धाटी - कांबोध)

धंद्या वंद्य आतां म्हणावें कोण रे । विश्र्व व्यापिलें पूर्ण ।नारायणें रे ॥धु्र॥

कवण देव तेथें कवण तो भक्त रे । येक भगवंत नांदे सदोदित रे ॥१॥

देव चैतन्य भक्त चैतन्य पूर्ण रे । नांव दोनी आत्मरूपें अभिन्न रे ॥२॥

देव भक्त एक भेदचि माईक रे । केशवराजीं भोगी अद्वय सुख रे ॥३॥

० पद ४०५ वें

भजनेवांचुनि ब्रह्मप्राप्ति जोडे । तरी संतांचें कां वंदावें अघोडे ॥

गिरीकपाटें सेविती व्यर्थ कडे । ऐसें न म्हणती ते ज्ञानगर्वें वेडे रे ॥धु्र॥

भक्तीवेगळें कोरडें ज्ञान काय । जालें परी तें वाढो न लाहे ॥

भक्तीविरक्ती पूर्ण जेथें आहे । ब्रह्मानंद वोळला तेथें पाहे रे ॥१॥

शास्त्रव्युत्पत्ती केवळ ज्ञान फांटा । फुटे तेणें सर्वांगि भरे ताठा ॥

अहं ज्ञाता या मीरवी प्रतिष्ठा । तया निदैविं कैंची ।आत्मानिष्ठा रे ॥२॥

अनन्यभक्तीचा धरितां निजवाटा । ब्रह्मसुखाच्या लागती वस्ती दाटा ॥

पायवाटा चढिजे वैकुंठा । द्रष्ट्यासी भेटुनी निजद्रष्टा रे ॥३॥

आत्मप्रतीतीची आवडी ज्यासी जीवीं । हरीभक्ती तेणें न सांडावी रे ॥

देहसमंधासी तिळांजळी द्यावी ॥ तरी तो देहींच सांपडे गोसावी रे ॥४॥

मुख्य ज्ञानासी भक्ती अधिकारू । भजनें मालवें समूळ अहंकारू ॥

सद्गुरुकृपें केशवीं भजनसारू । तेथें सहजचि आतुडे साक्षात्कारू रे ॥५॥

० पद ४०६ वें

निजतेजें सोज्वळ निजरूप निष्कळ ।

स्वानंदकंद केवळ म्हणती जया ॥ध्रु॥

पाहतां मानस धाय । पावल्या मीपण जाय ।

भोगिती योगीय । जयातें सदा ॥

तें मज दाविय बाईये । तें मज दावी बाईये ।

जें सर्वांचें निजगृह्य । सखीय वो ॥१॥

जालीयां जयाची प्राप्ती । न घडे पुनरावृत्ती ।

वर्णितां वेदश्रुती । वेडावल्या ॥

जे दृश्याहुनी पर । परेसी अगोचर ।

विश्रांतीचें घर । म्हणती जया ॥२॥

साराचें निजसार । अवयक्त अक्षर ।

तें आजी गोचर । करी वो सये ॥

ऐकोनि सखीने गोष्टी । स्वानंदे द्रवली पोटीं ।

केशवीं स्वरूपीं भेटी । अखंड केली ॥३॥

० पद ४०७ वें

काया धरीना परती करीना । माया वरीना अथवा हरीना ॥

कांही न पाहे असणें न साहे । योगी असा हे सरली दशा हे ॥ध्रु॥

कळेना तपें जें व्रतें आकळेना । परातीत पैं साधनीं वीवळेना ॥

महदृप तें दाविलें पूर्ण मातें । कसें वीसरावें तया सज्जनातें ॥२॥

सौंसार-तापशमना नमनार्थ आलों । वंदुनि पादकमळां तव दास जालों ॥

देउनि बोध बरवा निजदेव दावी । ठेवुनि नित्य स्व० पदीं स्वसुखें बुझावी ॥३॥

० पद ४०८ वें

चंद्र अमावस्ये । असोनी जैसा न दीसे ॥

आत्मा तैसा असे । न दिसोनि देहीं ॥ध्रु॥

काष्टामाजीं वन्ही । न दिसे जैसा असोनी ॥

आत्मा तैसा जनीं । न दिसोनी असे ॥१॥

पुष्पीं परिमळ पाहीं । असोनि न दिसे कांही ॥

आत्मा तैसा सर्वीं । न दिसोनी असे ॥२॥

सबाह्यांतरीं । वायु न दिसोनि क्रीडाकरी ॥

आत्मा चराचरीं । न दिसोनि तैसा ॥३॥

जठरीं बाळक कैसें । असतां न दिसें जैसें ॥

केशवीं निजरूप तैसें । जाणोनि राही ॥४॥

० पद ४०९ वें

गुरुविण न दिसे शिष्य आम्हां । शिष्याविण सद्गुरु नये कामा रे ॥ध्रु॥

अणुमात्र संदेह येथें नाहीं । ऐसें जाणें तो सहज गुरू पाही रे ॥१॥

शिष्यबोधें गुरुत्व पूर्ण आहे । गुरुबोधी शिष्यत्व कैंचे काय रे ॥२॥

गुरुशिष्य नेणोनि नांदे गुरू । सहजानंदी केशव निरंतरू रे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP