० पद १६० वें
चित्सुख-सागर नागरा हरी । भेटी अंतरी निरंतरी ॥ध्रु॥
म्हणवुनि शरण तुजला आलों । तुझ्या दासांचा दास मी जालों ॥१॥
जगचालक पालक देवा । मन मारुनि करवीं सेवा ॥२॥
म्हणे केशव देवराया । वेगीं निज० पद देईं वरा ॥३॥
० पद १६१ वें
ज्याची साउली पडतां माथां । अति पावन जालों आतां ॥ध्रु॥
त्याचीं पाउलें कैसें सोडूं ॥ काय त्याविण आणिक जोडूं ॥१॥
जेणें हातीं धरितां पाहें ॥ चित्तीं आनंद गंगा वाहे ॥२॥
म्हणे केशव ज्याची गोडी ॥ भवबंधन अवघें तोडी ॥३॥
० पद १६२ वें
भक्ति साधिती देवाची । त्यांसि संसार बाधा कैंची ॥ध्रु॥
भक्ति देवाची चांगली ॥ भाग्यवंतासी फावली ॥१॥
भक्ति अभेदयोगें केली ॥ त्यांची देहबुद्धी अवघी गेली ॥२॥
भक्ति केशवीं हाता आली ॥ भेटी भगवंताची जाली ॥३॥
० पद १६३ वें
भक्तिवांचुनि जें कां ज्ञान ॥ शुद्ध सोलिव तें अज्ञान ॥ध्रु॥
भक्तिपाशीं भुक्ती मुक्ती ॥ भक्तिपाशीं वोळगे शांती ॥१॥
भक्तिपाशीं सर्वही सिद्धी ॥ भक्तिपाशी सहजसमाधी ॥२॥
म्हणे केशव भक्ति साधा ॥ मग नाहीं भव-दुःख-बाधा ॥३॥
० पद १६४ वें
मज नावडे धन-सुत-दारा ॥ मन हरिणि जालें वारा ॥ध्रु॥
आतां सांगुं म कवणालागीं ॥ हरिकारण चित्त विरागी ॥१॥
हरिदर्शन मजला नाहीं ॥ तरी मरण नये कां पाहीं ॥२॥
म्हणे केशव प्राणविसांवा ॥ दीन-बांधव भेटेल केव्हां ॥३॥
० पद १६५ वें
देव सांडुनि देहभरी ॥ भक्त पूजीतसे बाहेरी ॥ध्रु॥
कैसा पूजेचा लवलाहो ॥ मुख्य देवचि न कळे पाहो ॥१॥
देव स्वतःसिद्ध सर्वांठायीं ॥ भक्त प्रतिमेसी पूजित पाहीं ॥२॥
गुरुकृपें केशवीं भावो ॥ भावें सर्वही जाला देवो ॥३॥
० पद १६६ वें
संसारसागरीं तारावयालागीं ॥ कर्णोधारू सद्गुरु तो जगीं ॥ध्रु॥
भक्तीचीया नांवें जड जीवा घातलें ॥ निष्कामासी कासेसी
लाविलें ॥१॥
बाप कृपाळू सद्गुरु राणा ॥ शरणागतांसी तारीलें जाणा ॥२॥
श्रवण-मननादी देव्हडे देउनी ॥ दास तारीले अपार जीवनीं ॥३॥
विज्ञान-सांगडी देउनी यका ॥ उतरीयलें पैलतीरीं देखा ॥४॥
ऐलतिरी असतां पैलतीरीं नेलें ॥ दीनानाथें कैसें नवल केलें ॥५॥
केशव म्हणे याची काय सांगू थोरी ॥ तारूनी दीधला ठाव उदरीं ॥६॥
० पद १६७ वें
अचळ सुखाच्या दातारा । सकळ जनाच्या उद्धारा ॥ध्रु॥
येईं बोर तूं येईं बा रे । उचलुनि कडिये घेईं बा रे ॥१॥
अचित-भुवना मज नेईं अलभ्य लाभाप्रति देई ॥२॥
विराजमाना निजमाना । म्हणे केशव मुनिजन-निधाना ॥३॥
० पद १६८ वें
निज० पद-गौरव-दायक हा । पंडितमंडळि नायक हा ॥ध्रु॥
भज रे मना भवनाशक हा । अंतर्ज्योति-प्रकाशक हा ॥१॥
जनन-मरण-भयमर्दन हा । अलभ्य लाभे-विवर्धन हा ॥२॥
गोवर्धन गति भक्षक हा । म्हणे केशव त्रिभुवनरक्षक हा ॥३॥
० पद १६९ वें
शोक-विनाशक निजदाता । त्रिभुवननायक भज आतां ॥ध्रु॥
आठवला हरि आठवला । हृदयसरोजीं सांठवला ॥१॥
मुनिवर-जनमन-रंजन वो । भेद-प्रभंजन चिद्धन वो ॥२॥
बळि-बंधन बंध-विमोचन वो । म्हणे केशव मंगळ-लोचन वो ॥३॥
० पद १७० वें
रमणीय नाम सुखधामा । स्वयंप्रकाशा सम रामा ॥ध्रु॥
अखंड आम्ही तुज पाहों । मीपण ग्रासुनि स्थिर राहों ॥१॥
सकळ विचारातित सारा । अविकारा निज दातारा ॥२॥
अति मंगळ केवळ रमणीय । म्हणे केशव सज्जन भजनीं या ॥३॥
० पद १७१ वें
सांगुनि मोक्षविचारा वो । मारामार विकारा वो ॥ध्रु॥
तारा वो मज तारा वो । आनंदघनीं द्या थारा वो ॥१॥
सांडुनि विषय-पसारा वो । सादर मन विस्तारा वो ॥२॥
दाउनि परम अपारा वो । म्हणे केशव भेद निवारा वो ॥३॥
० पद १७२ वें
संशय शत्रु-प्रभंजन हा । पावन जन्म निरंजन हा ॥ध्रु॥
भज रे भवार्णव तारण हा । सर्वही शोक-निवारण हा ॥१॥
भेद-भयानक-नाशक हा । वेदन सूर्य प्रकाशक हा ॥२॥
अचळ सुखाचें कारण हा । म्हणे केशव कारण हारण हा ॥३॥
० पद १७३ वें
पातक-जाळ-निवारण हा । मोक्ष० पदाप्रति कारण हा ॥ध्रु॥
शीघ्र भजा अतिशीघ्र भजा । जाणपणाचा फुंज तजा ॥१॥
मन्मथ-तक्षक-भक्षक हा । सुखधन सज्जन रक्षक हा ॥२॥
अक्षयवैभव-दायक हा । केशव म्हणे निजनायक हा ॥३॥
० पद १७४ वें
अचळ सुखाप्रति कारण हा । संशयजाळ-निवारण हा ॥ध्रु॥
भज मना तूं भज मना । मोक्षप्रदायक ज्ञानघना ॥१॥
स्मरणें मत्सर-मारक हा । घोर भवार्णवतारक हा ॥२॥
मनवारण दंडण खंडण हा । म्हणे केशव निज० पदमंडण हा ॥३॥
० पद १७५ वें
बोधें जर्जर म्यां स्मर केला । कस्मळ मत्छर गेला ॥ध्रु॥
म्हणवुनि स्थिर जालों शिवपाईं । न पडेचि या भवडोहीं ॥१॥
रमति संसारी समयोगें । उपाधि शमला वेगें ॥२॥
केशवस्वामीच्या ० पद भजनीं । सरला माय रजनी ॥३॥
० पद १७६ वें
झडकरी नासुनिया भव करि रे । स० पदीं निश्र्चळ करि रे ॥ध्रु॥
त्रिभुवनतारक तो नरहरि रे । पाहतां मीपण हरि रे ॥१॥
भजनें रतिरमणा निर्दाळी । जाळी मत्सर जाळी ॥२॥
इंद्रिय गणतिचा प्रकाशिता । केशव म्हणे जनीता ॥३॥
० पद १७७ वें
अंतरि श्रीहरि हा घन दाटे । भजतां भवनदि आटे ॥ध्रु॥
म्हणवुनि सुख मोठें मज होतें । वदतां न येतें न येतें ॥१॥
बोधदिवा पतिच्या निजउदईं । रघुपति दिसतो हृदयीं ॥२॥
केशवस्वामीचें रूप कळलें । कळलें म्हणणें गळलें ॥३॥
० पद १७८ वें (राग-दीर्घ धाटी)
सोयरा श्रीराम त्याचा हात धरूनी जावें ।
हांसती लोक त्यांसी सुखें हांसू द्यावें ॥ध्रु॥
वासनेचें बंड जगीं वाढवी उदंड ।
संतसंगे ज्ञानयोगें करी शतखंड ॥१॥
काळीकराळी तोचि कल्पनेची जाळी ।
जाळुनीयां घ्यावें चिन्मय वनमाळी ॥२॥
तळमळेचि गांठ सुटे खळखळ तुटे जेणें ।
केशव म्हणे आतां तोचि निजलाभ घेणें ॥३॥
० पद १७९ वें
निजाचें गुज सांगेन सहज ते तूं माय माझें बुझ ॥
रात्रि दिवस मज लागलेंसें निज तें मीं काय सांगूं तुज ॥ध्रु॥
निजाहातीं मज नाठवेचि कांही अखंड लागलें नीज ॥
निजीं निजात्मता जालें तन्मयता तेथें नाहीं उमज रे रे ॥
यापरी निज जाले सहज अहिर्निशीं नीज लागे ॥
निजाचे निजीं निजुनी गेलों तों नीजाचि जालों आंगे रे रे ॥१॥
कल्पनेचें बीज अबीज जाहलें पावला सहनी पातु ॥
मन होतें तें ठाईं निमालें पुरला वृत्तिसि अंतु ॥
विस्मयाचा उत जिरोनि गेला मावळला मुळिं हेतु ॥
चहुं देहाची अवस्था खुंटली कवळ सांगे तेथें मातु रे रे ॥२॥
अखंड नीज असें सहज सांगणे तेथें काई ॥
सांगणें परीस नेण ऐसें जें कांही हें तंव तेथें नाहीं ॥
आपेआप नीज आपण संचले हेंही म्हणे कोण पाहीं ॥
गुरुकृपें केशवीं निजीं निजेला तो निमाला ठाईचा ठाईं रे ॥३॥
० पद १८० वें
प्रेमाचें गुह्य सुखाचें भांडार । विश्रांतीचें घर योगियांचे ॥ध्रु॥
एक वेळा दृष्टि दाखवा ग माय । म्हणवुनियां पाया धरितु असे ॥
दाखवा ग माय तें रूप डोळां । जीव उतावळा भेटीलागीं ॥१॥
निर्गुण निराकार निरामय स्वरूप । नाम आणि रूप नाहीं ज्यासी ॥
तें मी तुज डोळां दाखवूं कैसें । पाहे पां ऐसें विचारुनी वो ॥
दावीजेसें नाहीं दाऊं कसें माय । नाथिलेंचि काय छंदू घेसी ॥२॥
विचारूनी हेची स्वरूपी करा भेटी । आसावलें दृष्टी दर्शनासी ॥
म्हणवुनि माझें चित्त कासावीस होय । दाखवा त्या सोय
स्वरूपाची ॥
दाखवा ग माय तें रूप डोळां । जीव उतावळा भेटी लागीं ॥३॥
अनुर्वाच्य ब्रह्म हें महावाक्य रहस्य । मनुबुद्धि प्रवेश नव्हेचि कांही ॥
तें मी कैसें तुज दाखउं साजनी । वृत्ति हे लाजोनी गेली जेथें ॥
दावीजेसें नाही दाऊं कैसें माय । नाथिलेंचि काय छंदू घेशी ॥४॥
छंदु हाची मनीं आहे अहर्निशीं । जें पहावें दृष्टीसी निजरूप ॥
तेणें सुखरूप होय माझें मन । नीवती लोचन प्रेमबोधें ॥
दाखवा ग माय तें रूप डोळां । जीव उतावळा भेटी लागीं ॥५॥
शब्दा अगोचर परेपरते गुज । विचारी हे गोष्टी स्वानुभवें ॥
मन-बुद्धिपरते अंतःकरणावरूते । विचारी गुज ते गुरुकृपें ॥
दावीजेसें नाही दाऊं कैस माय । नाथिलेंची काय छंदू घेसी ॥६॥
स्वानुभवें पाहतां वृत्ति तन्मय जाली । केशवीं बाणली गुरुकृपा ॥
आपआप तेथें जालें समाधान । रूपेंवीण दर्शन स्वरूपाचें ॥
फिटली ग माय दरशनाची भूली । मौन्यासींही पडली मौन्यमुद्रा ॥७॥