मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
फुलें वाहिली देवाकरिता । ...

जय मृत्युंजय - फुलें वाहिली देवाकरिता । ...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


फुलें वाहिली देवाकरिता ।
वंचित राहुनि सुखाते स्वतां ।
लोकहिताचा गंध पसरतां । अमर होय ती वंशलता ॥धृ०॥
देउनिया वात्सल्य साउली
मातेची तूं उणीव भरली ।
पत्र पावले । कळला आशय
बंधु तुला गे वंदित सविनय ।
आराध्य जिचे भारतमाता । अमर होय ती वंशलता ॥१॥
पुष्पे फुलती गळती सुकती
सर्व न देवालागी जाती ।
गजेन्द्र वाही उत्पल हरिला
आला अमरपणा कमलाला ।
नसे मान भुवनीं त्या परता । अमर होय ती वंशलता ॥२॥
यौवनसुमनें सर्व खुडावी
श्रीरामाच्या कामी यावीं ।
मातृभूमिने प्रसन्न व्हावें ।
त्या सेवेला मानुनि घ्यावें ।
गोत्राला ये तये धन्यता । अमर होय ती वंशलता ॥३॥
रक्तमांसयुत नश्वर काया
सेवेला देशाच्या द्याया ।
लागो स्पर्धा नवयुवकांची
तीच शाश्वती अमरत्वाची ।
या पथीं धाडतां । अमर होय ती वंशलता ॥४॥
युवकसुमांच्या गुंफुनि माला
अर्पुनि होता नवरात्रीला ।
उजाडेल दसरा देशाचा
विजयश्रीचा स्वातंत्र्याचा ।
झाली जरि आर्या विवासिता । अमर होय ती वंशलता ॥५॥
धन्य आपला झाला वंश्
नि:संशय देवाचा अंश् ।
भजला पुष्पांनी श्रीराम्
सर्वस्वाचे देऊनि दाम् ।
या पूजेचे भाग्य लाभता । अमर होय ती वंशलता ॥६॥
धैर्याची तू मूर्ती वहिनी
माते ! माझ्या स्फूर्तिची धुनी ।
अग्नीमध्ये अथवा शिशिरीं
अचल तू ! जसा भूवरी गिरी ।
धीरान संकटी वर्तता ! अमर होय ती वंशलता ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP