मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
शेवटचा हा रामराम सन्मित्र...

जय मृत्युंजय - शेवटचा हा रामराम सन्मित्र...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


शेवटचा हा रामराम
सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥धृ०॥
भारतभूमिचे मणी विखूरले सेवेसाठी दीक्षित झाले ।
बंधुत्वाच्या मृदुल रेशमी धाग्याने एकत्र बांधले ।
नेमुनि देई त्यास विधाता कार्यासाठी भिन्न ठिकाणें ।
कधी कीर्तिच्या लाटांवर वा कधी उदधिच्या उदरी जाणे ।
जिथे योजना तेथे जाऊ
जळत्या अश्मावरती राहू ।
स्थान आपुले पहिले घेऊ ।
मला योजिले विधिने काम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥१॥
रंगभूमि होई वसुंधरा, भवितव्याचे भव्य कथानक ।
इतिहासाच्या कालपटावर आपण पात्रे करतो नाटक ।
उत्तम आपुले साध्य गाठता ।
यशोगर्जना करील जनता ।
भरतवाक्य तें कानीं येता ।
भेटुनि बोलूं जयजयराम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥२॥
अंदमानचा उदास ओढा सामावो माझ्या अस्थींना ।
स्फटिकतारकासारखी जान्हवी कवटाळो वा ह्रदयीं त्यांना ।
चैतन्याने उसळतील त्या बंधमुक्त भारत होतांना ।
सर्वकष गर्जना जयाची उच्चरवाने दुमदुमतांना ।
आक्रमिलेला सागर लंघुनि ।
समंध जाइल तेव्हा परतुनि ।
वैभव भारतभू सांभाळुनि ।
घरा सुखाचे होईल धाम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम् ॥३॥
त्याग आपल्या हातामध्ये, फल नियतीची इच्छा राही ।
मार्ग मुक्तिचा भारतभूच्या आत्मत्यागापरता नाही ।
त्या प्रगतीची ठेवा दृष्टी न्यून उरावे त्यांत न कांही ।
राखेमध्ये हौतात्म्याच्या वस्तु-वास्तुने पूत धरा ही ।
वास्तूचा त्या निश्चल पाया ।
भारतभूसाठी बांधाया ।
चला पुढे लोहित अर्पाया ।
ईशाचे ते पावन काम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP