सर्वसाधारण - कलम ७९ ते ८१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


संसदेची रचना .

७९ . संघराज्याकरता एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे " राज्यसभा " व " लोकसभा " म्हणून ओळखली जाणारी अशी दोन सभागृहे मिळून ती बनलेली असेल .

राज्यसभेची रचना .

८० . ( १ ) [ * * * राज्यसभा ] ---

( क ) खंड ( ३ ) च्या तरतुदींनुसार राष्ट्रपतीने नामनिर्देशित करावयाचे बासा सदस्य ; आणि

( ख ) राज्यांचे [ व संघ राज्यक्षेत्रांचे ] दोनशे अडतीसपेक्षा अधिक नसलेले प्रतिनिधी , मिळून बनलेली असेल .

( २ ) राज्यसभेतील ज्या जागा राज्यांच्या [ व संघ राज्यक्षेत्रांच्या ] प्रतिनिधींनी भरावयाच्या त्या जागांची वाटणी चौथ्या अनुसूचीत अंतर्भूत असलेल्या त्यासंबंधीच्या तरतुदींच्या अनुसार होईल .

( ३ ) खंड ( १ ) चा उपखंड ( क ) याखाली राष्ट्रपतीने नामनिर्देशित करावयाचे सदस्य म्हणजे पुढे दिलेल्या बाबीसंबंधी विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्ती असतील , त्या बाबी म्हणजे : -

वाडमय , शास्त्र , कला व समाजसेवा .

( ४ ) [ * * * ] प्रत्येक राज्याचे राज्यसभेतील प्रतिनिधी त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निवडून दिले जातील .

( ५ ) [ संघ राज्यक्षेत्राचे ] राज्यसभेतील प्रतिनिधी , संसद कायद्याद्वारे विहित करील अशा रीतीने निवडले जातील .

लोकसभेची रचना .

८१ . * ( १ ) [ अनुच्छेद ३३१ च्या * * * तरतुदींच्या अधीनतेने ] लोकसभा ---

( क ) राज्यांमधील क्षेत्रीय मतदारसंघांमधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले [ पाचशे तीस ] पेक्षा अधिक नसलेले सदस्य , आणि

( ख ) संघ राज्यक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी , संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने निवडलेले [ वीस ] पेक्षा अधिक नसलेल सदस्य ,

मिळून बनलेली असेल .

( २ ) खंड ( १ ) चा उपखंड ( क ) याच्या प्रयोजनार्थ , ---

( क ) लोकसभेत प्रत्येक राज्याला अशा रीतीने जागा वाटून देण्यात येतील की , त्या जागांची संख्या व त्या राज्याची लोकसंख्या यांचे परस्पर प्रमाण , व्यवहार्य असेल तेथवर , सर्व राज्यांच्या बाबतीत सारखेच असेल ; आणि

( ख ) प्रत्येक राज्य अशा रीतीने क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागण्यात येईल की , प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व त्यास वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे परस्पर प्रमाण , व्यवहार्य असेल तेथवर , राज्यात सर्वत्र सारखेच असेल :

[ परंतु , एखाद्या राज्याची लोकसंख्या सहा दशलक्षांपेक्षा जास्त होत नाही तोवर , त्या राज्याला लोकसभेतील जागा वाटून देण्याच्या प्रयोजनार्थ , या खंडाच्या उपखंड ( क ) च्या तरतुदी लागू होणार नाहीत . ]

( ३ ) या अनुच्छेदात " लोकसंख्या " या शब्दप्रयोगाचा अर्थ , ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत अजमावलेली लोकसंख्या , असा आहे :

[ परंतु , या खंडातील " ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत " या उल्लेखाचा अर्थ , सन [ २०२६ ] नंतर होणार्‍या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत ,---

[ ( एक ) खंड ( २ ) चा उपखंड ( क ) आणि त्या खंडाचे परंतुक यांच्या प्रयोजनांसाठी , १९७१ सालच्या जणगणनेत ; आणि

( दोन ) खंड ( २ ) चा उपखंड ( ख ) याच्या प्रयोजनांसाठी [ २००१ ] सालच्या जनगणनेत ] असा लावला जाईल . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP