सर्वसाधारण - कलम ८२ ते ८४

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


प्रत्येक जनगणनेनंतर पुनःसमायोजन .

८२ . प्रत्येक जनगणना पूर्ण झाल्यावर , लोकसभेतील जागांची राज्यांना दिलेली वाटणी आणि प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघामध्ये केलेली विभागणी यांचे , संसद कायद्याद्वारे निर्धारित करील अशा प्राधिकार्‍याकडून व अशा रीतीने पुनःसमायोजन केले जाईल :

परंतु , अशा पुनःसमायोजनामुळे , त्यावेळी अस्तित्वात असलेल्या लोकसभेचे विसर्जन होईपर्यंत त्या सभागृहातील प्रतिनिधित्वावर परिणाम होणार नाही :

[ परंतु आणखी असे की , असे पुनःसमायोजन , राष्ट्रपती आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा दिनांकापासून प्रभावी होईल आणि असे पुनःसमायोजन प्रभावी होईपर्यंत , त्या सभागृहाची कोणतीही निवडणूक अशा पुनःसमायोजनापूर्वी विद्यमान असलेल्या क्षेत्रीय मतदारसंघांच्या आधारे घेता येईल :

परंतु तसेच , सन [ २०२६ ] नंतर होणार्‍या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत ,---

[ ( एक ) १९७१ सालच्या जनगणनेच्या आधारे राज्यांना लोकसभेतील जागांची मिळालेली वाटणी ; आणि ( दोन ) [ २००१ ] सालच्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक राज्याची क्षेत्रीय मतदारसंघांमध्ये झालेली विभागणी , यांचे या अनुच्छेदाखाली पुनःसमायोजन करण्याची आवश्यकता असणार नाही ] ].

संसदेच्या सभागृहांचा कालावधी .

८३ . ( १ ) राज्यसभा विसर्जित होणार नाही , पण संसदेने कायद्याद्वारे निवृत्तीसंबंधात केलेल्या तरतुदींअनुसार तिच्या सदस्यांपैकी शक्य होईल तितपत एक तृतीयांश इतके सदस्य दर दुसर्‍या वर्षाच्या अखेरीनंतर शक्य तितक्या लवकर निवृत्त होतील .

( २ ) लोकसभा , तत्पूर्वी ती विसर्जित झाली नाही तर , तिच्या पहिल्या सभेकरता नियत केलेल्या दिनांकापासून [ पाच वर्षेपर्यंत ] चालू राहील , त्यापेक्षा अधिक काळ नाही आणि [ पाच वर्षांचा ] उक्त कालावधी संपला की , ते सभागृह विसर्जित होईल :

परंतु , आणीबाणीची उदघोषणा अंमलात असताना , संसदेला कायद्याद्वारे उक्त कालावधी एका वेळी अधिकाधिक एक वर्षापर्यंत वाढवता येईल , आणि तो कोणत्याही परिस्थितीत , उदघोषणा अंमलात असण्याचे बंद झाल्यापासून सहा महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही .

संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता .

८४ . एखादी व्यक्ती ,---

[ ( क ) ती भारताची नागरिक असल्याखेरीज आणि निवडणूक आयोगाने शपथ किंवा प्रतिज्ञा यांच्या संबंधात प्राधिकृत केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर , त्या प्रयोजनाकरता तिसर्‍या अनुसूचीत दिलेल्या नमुन्यानुसार तिने शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करुन त्याखाली सही केलेली असल्याखेरीज ; ]

( ख ) राज्यसभेतील जागेच्या बाबतीत , ती किमान तीस वर्षे वयाची आणि लोकसभेतील जागेच्या बाबतीत , ती किमान पंचवीस वर्षे वयाची असल्याखेरीज ; आणि

( ग ) संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली त्यासंबंधात विहित केल्या जातील अशा इतर अर्हता तिच्या ठायी असल्याखेरीज ,

संसदेमधील जागा भरण्याकरता होणार्‍या निवडणुकीस पात्र होणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP