धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती .
१०९ . ( १ ) धन विधेयक राज्यसभेत प्रस्तुत केले जाणार नाही .
( २ ) लोकसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर , ते राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवले जाईल , आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत , राज्यसभा आपल्या शिफारशींसह ते लोकसभेकडे परत पाठवील व तदनंतर , लोकसभेला राज्यसभेच्या सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील .
( ३ ) लोकसभेने राज्यसभेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या तर , धन विधेयक , राज्यसभेने शिफारस केलेल्या व लोकसभेने स्वीकारलेल्या सुधारणांसह दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .
( ४ ) लोकसभेने राज्यसभेच्या शिफारशींपैकी कोणत्याही शिफारशी स्वीकारल्या नाहीत तर , धन विधेयक , लोकसभेने जसे पारित केले होते तशा स्वरुपात , राज्यसभेने शिफारस केलेल्यांपैकी कोणत्याही सुधारणेशिवाय ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .
( ५ ) जर लोकसभेने पारित केलेले व राज्यसभेकडे तिच्या शिफारशींकरता पाठवलेले धन विधेयक , उक्त चौदा दिवसांच्या कालावधीच्या आत लोकसभेकडे परत पाठविण्यात आले नाही तर , उक्त कालावधी संपल्यावर , ते लोकसभेने जसे पारित केले होते तशा स्वरुपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल .