संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार , विशेषाधिकार , इत्यादी .
१०५ . ( १ ) या संविधानाच्या तरतुदी आणि संसदेच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणारे नियम व स्थायी आदेश यांना अधीन राहून ; संसदेत भाषणस्वातंत्र्य असेल .
( २ ) संसदेचा कोणताही सदस्य , संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीत त्याने केलेल्या कोणत्याही वक्तव्याच्या किंवा त्याने केलेल्या कोणत्याही मतदानाच्या बाबतीत , कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीस पात्र होणार नाही , आणि कोणतीही व्यक्ती संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाच्या प्राधिकाराअन्वये किंवा त्याखाली कोणताही अहवाल , कागदपत्र , मतदान किंवा कामकाजवृत्त यांच्या प्रकाशनाबाबत याप्रमाणे पात्र होणार नाही .
( ३ ) अन्य बाबतीत , संसदेचे प्रत्येक सभागृह आणि प्रत्येक सभागृहाचे सदस्य व समित्या यांचे अधिकार , विशेषाधिकार व उन्मुक्ती या , संसद , कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित करील अशा असतील , आणि त्याप्रमाणे निश्चित होईपर्यंत , [ त्या , सभागृहाला आणि त्याच्या सदस्यांना आणि समित्यांना " संविधान ( चव्वेचाळिसावी सुधारणा ) अधिनियम , १९७८ " याचे कलम १५ अंमलात येण्याच्या लगतपूर्वी जशा होत्या तशा असतील . ]
( ४ ) खंड ( १ ), ( २ ) व ( ३ ) यांच्या तरतुदी जशा संसदेच्या सदस्यांच्या संबंधात लागू आहेत तशा त्या , या संविधानाच्या आधारे संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा तिच्या कोणत्याही समितीत भाषण करण्याचा व अन्यथा तिच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तींच्या संबंधात लागू असतील .
सदस्यांचे वेतन व भत्ते .
१०६ . संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य हे , संसद कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील असे वेतन व भत्ते मिळण्याला व त्याबाबत त्याप्रमाणे तरतूद होईपर्यंत , या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्यूअंट असेंब्लीच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तींवर भत्ते मिळण्याला , हक्कदार असतील .