सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे .
९९ . संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा प्रत्येक सदस्य , आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी , राष्ट्रपतीसमोर अथवा त्याने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे याच्या संबंधात नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर तिसर्या अनुसूचीत त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करुन त्याखाली सही करील .
सभागृहांमधील मतदान , जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती .
१०० . ( १ ) या संविधानात अन्यथा तरतूद केली असेल तेवढे सोडून इतर बाबतीत , कोणत्याही सभागृहाच्या बैठकीतील किंवा सभागृहांच्या संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्न , अध्यक्षाच्या अथवा सभापती किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करणार्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणार्या सदस्यांच्या बहुमताने निर्णीत केले जातील .
सभापती किंवा अध्यक्ष , किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती पहिल्या फेरीत मतदान करणार नाही , पण मते समसमान झाल्यास , तिला निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल व तो अधिकार ती वापरील .
( २ ) संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्यकुलात कोणतीही जागा रिक्त असली तरी त्या सभागृहाला कार्य करण्याचा अधिकार असेल , आणि संसदेतील कोणतेही कामकाज , त्या कामकाजाच्या वेळी तेथे स्थानापन्न होण्याचा किंवा मतदान करण्याचा किंवा अन्यथा भाग घेण्याचा जिला हक्क नव्हता अशा एखाद्या व्यक्तीने ते केले आहे , असे मागाहून आढळून आले तरीही , विधिग्राह्य राहील .
( ३ ) संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करीपर्यंत , संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाची सभा होण्यासाठी गणपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक - दशांशाइतकी असेल .
( ४ ) एखाद्या सभागृहाची सभा चालू असताना एखाद्या वेळी गणपूर्ती झालेली नसेल तर सभागृह तहकूब करणे किंवा गणपूर्ती होईपर्यंत सभा स्थगित करणे , हे सभापतीचे किंवा अध्यक्षाचे , किंवा त्या नात्याने कार्य करणार्या व्यक्तीचे कर्तव्य असेल .