कार्यपद्धतीचे नियम .
११८ . ( १ ) संसदेच्या प्रत्येक सदस्यास , या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून , आपली कार्यपद्धती आणि कामकाज - चालन यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील .
( २ ) खंड ( १ ) खाली नियम केले जाईपर्यंत , या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचरबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे , राज्यसभेचा सभापती , किंवा यथास्थिति , लोकसभेचा अध्यक्ष त्यात जे फेरबदल व अनुकूलने करील त्यांसह , संसदेच्या संबंधात प्रभावी असतील .
( ३ ) राष्ट्रपतीला , राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांचा विचार घेतल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील .
( ४ ) दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत खंड ( ३ ) खाली केलेल्या कार्यपद्धति - नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील .
वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन .
११९ . संसदेस , वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी , कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल , आणि , याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद , अनुच्छेद ११८ च्या खंड ( १ ) खाली संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी त्या अनुच्छेदाच्या खंड ( २ ) खाली संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर व तेवढया मर्यादेपर्यंत , अशी तरतूद अधिक प्रभावी ठरेल .