रेणुकेचें अष्टक - पहिलें
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( वृत्त : दिंडी )
अखिल पतितांची, दुरित कृती केली
पतितपावन ही, कीर्ति आयकेली
म्हणुनि पडलों येउनी तुझ्या दारीं
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१॥
मूळपीठ स्वस्थानिं वास केला
सतत जपलों मी नाममालिकेला
बहुत दिन गे, घातली तुझी वारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥२॥
जरी आहे मी स्वार्थ - काम - साधू
तरी लोकांनीं मानियलें साधू
तुझ्या नांवाची दाखवितों थोरी
लाज याची रेणुके तुला सारी ॥३॥
नसे ब्रह्मांडीं तुझ्यावीण कोणी
अतां वेगें उडि घालि सुनिर्वाणीं
त्रिविध तापें तापलों असे भारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥४॥
गृहीं व्यालेली कामधेनु माय
ग्रामलोकांसी ताक मागुं काय
कृपण म्हणतिल निर्दैवि हा भिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥५॥
जन्मतां गाजे सिंहिणिचें तोक
ग्रामसिंहाचे संगे करी शोक
जंबुकाचें भय कंप घे शिकारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥६॥
होय सर्पाची दासि गरुड - माता
गलंडानें वैद्याचि रडे कांता
समर्थाचा आश्रीत करी चोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥७॥
तुझ्या नामीं विश्वास अल्प नाहीं
म्हणुनि धांवे दुष्कीर्ति कल्पना ही
पतित पापी मी परम दुराचारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥८॥
तुझ्या चरणाची भेट घ्यावि वाटे
परी नेते प्रारब्ध आडवाटें
गळां पडली दृढ संचिताचि दोरी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥९॥
अहा ! दारिद्र्यें पीडित गृह - दारा
कर्जदारहि धावोनि येति दारा
त्यात रोगाची दाटली उभारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१०॥
चलित दिवसाची साथि काकि मामी
परी निर्वाणीं कुणि न ये कामीं
निर्धनाची मानिती ते शिसारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥११॥
पहा बुडतों मी दुःखसागरांत
कशी बसलिस तूं स्वस्थची घरांत
कृपावंते ही विनती अवधारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१२॥
सर्व माझे अजि हारले उपाय
म्हणुनि अंबे धरियले तुझे पाय
विष्णुदासाची दीनजननी, तारी
लाज याची रेणुके, तुला सारी ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP