( वृत्त - भुजंगप्रयात )
दयाळे ! तुझ्या कोटि ब्रह्मांड पोटीं
स्वयें पाळिशी जीव कोट्यानकोटी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१॥
कधीं आपुलें दाविसी मूळपीठ
मिळो ना मिळो खावया गूळ - पीठ
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥२॥
तुझ्यापाशिं राहीन खाईन भाजी
जगामाजि सांगेन ही माय माझी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥३॥
बरा नाहिं का मी धुया लुगडें हो
अशा पूरवावी दयाळू गडे, हो
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥४॥
तुझी भक्ति अंगामधें संचरावी
तुझी माउली वेणि म्यां विंचरावी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥५॥
तुला प्रार्थना हीच जोडूनि पाणी
तुझ्या द्वारिं राहीन, वाहीन पाणी
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥६॥
नसे द्यावया वस्त्र यद्वा दशीला
तुझ्या पंक्तिला येउं दे द्वादशीला
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥७॥
जिवाहूनि आतां करुं काय दान
आईनें रुसावें असा कायदा न
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥८॥
सदा विष्णुदासाचिया हे अगाई
दया येउं दे जाहलों गाइ - गाई
नुपेक्षी मला आदिमाये ! परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥९॥