( वृत्त : भुजंगप्रयात )
सदा सर्वदा मोरया, शारदाही
सदा सर्वदा सदगुरुंच्या पदांही
नमावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१॥
सदा सर्वदा नित्यनेमें प्रभातें
विधी - श्रीहरी - पार्वतीवल्लभातें
स्मरावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥२॥
सदोदीत माता, पिता, ज्येष्ठबंधू
सदोदीत धेनू, यती, विप्र, साधू
भजावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥३॥
पडन्यास, मुद्रा, योगसूत्रें पदेचीं
अनुष्ठान, संध्या, मालिका त्रिपदेचीं
जपावी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥४॥
सदा सर्वदाही तपोयज्ञदान
यथासांगची देवपूजाविधान
करावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥५॥
बहू देव, देवी, रवी, चंद्र, तारा
बहू रंग लीला, बहू आवतारा
गणावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥६॥
सदा वेद शास्त्रें, पुराणें, कवीता
सदाऽभंग, ज्ञानेश्वरी, मूळगीता
पढावी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥७॥
अयोध्यापुरीं, द्वारका - पुण्यक्षेत्रीं
प्रयागीं, त्रिवेणी, महातीर्थ यात्रीं
भ्रमावें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥८॥
प्रकाशीत नानाऽऽकृती - रंग - रुपें
शिळा, हेम, ताम्र, लोह, वंग, रुपें
आकारें, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥९॥
सदा विष्णुदासाचिया सन्निधानीं
रहावें अतां निर्वाणीं निधानीं
नुपेक्षी, परंतू परंतू परंतू
अवो रेणुके, रेणुके, रेणुके ! तूं ॥१०॥