रेणुकेचें अष्टक - पंधरावें

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


वृत्त : ( शिखरिणी )
न द्यावी कां वाटे, पतित म्हणुनी भेट मजला ।
न घ्यावी कां वाटे, खबरहि अनाथाचि तुजला ॥
नतोद्धारायाची, सय अझुनि कां येउंच नये ।
अगाई रेणुके ! किति दिन असे बोलुंच नये ॥१॥
म्हणेना बाई ये, जवळ पिपिलीके शर्करा ।
म्हणेना अंगासी, मर्दन मला केशर करा ॥
तसें बुद्ध्या येणें, मज तुजकडे भाग पडतें ।
अगाई रेणुके ! मजविण तुझें काय अडतें ॥२॥
अनंदे तूं भेटी, खचित मज देशील म्हणुनी ।
अनंदें मीं होतों, अजवर अयुष्यासि गणुनी ॥
निदानीं राहीला, मरणलग हा वाद शिलकीं ।
अगाई रेणुके ! कशि तुं निगमा वादशिल कीं ॥३॥
उपेक्षा दीनाची, करतिस तुझी बाइ मरजी ।
नसे जागा द्याया, तुजवर अपीलाचि अरजी ॥
दया माया कांहीं, मजविषयिं चित्तांत नसुं दे ।
अगाई रेणुके ! अठवण तुला माझि असुं दे ॥४॥
अनावृष्टीनें या, मरतिल किती जीव न कळे ।
तुझीं हीं जीं बाळें, जगतिल किती जीवनकळे ॥
कसें झालें ? आलें, प्रलयसम हें वर्ष बिघन ।
अगाई रेणुके ! सदय ह्रदयें वर्षवि घन ॥५॥
जिलाही दीनाची, निगम म्हणती कल्पलतिका ।
दिनाचा वेलीनें कवळुनी गळा कापिल ति कां ॥
कशी झाली रक्षा - कर हयग्रिवा सायक रसी ।
अगाई रेणुके ! विपरित असें काय करसी ॥६॥
असोनी तूं माझ्या, ह्रदयिं फिरवीसी दशदिशा ।
कुटस्था लावीली, जनन मरणाची अवदशा ॥
सवेंची म्हातारा, करुनि करिसी बाळ तरणा ।
अगाई रेणुके ! तुजजवळ ही कां प्रतरणा ॥७॥
करावें तें केलें, तिळभर उणें नाहिं पडलें ।
तुझ्या एक्या नामीं, सकलहि मला धर्म घडले ॥
कृपेचें राहीलें, उचित प्रिय देणें तुजकडे ।
अगाई रेणुके ! लवकर अतां घे मजकडे ॥८॥
अहो मी अन्यायी, म्हणवुन उपेक्षा करुं नये ।
क्षमावंते, माते ! निजपथ क्षमेचा त्यजुं नये ॥
पतीतोद्धारायास्तव मिरविसी कंकण करीं ।
अगाई रेणुके ! पतित मी अहों पावन करी ॥९॥
दिनाची तूं आई, अलिस दृढ आह्मां समजुनी ।
कृपादृष्टी ठेवी, निज परशुरामा समजुनी ॥
तरी दीनाला घे, जवळ स्तन देवोनि अननीं ।
अगाई रेणूके ! जरि तुं अससी दीन - जननी ॥१०॥
स्वयें विष्णूदासा - वदनिं वदवीसी शिखरिणीं ।
जशी अंबा रंभा, मधुफळ रसाची शिकरिणी ।
तशी ही सद्विद्याक्षर शिकविशी बोधक मला ।
अगाई रेणुके ! नमन तुझिया पादकमला ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : September 05, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP