रेणुकेचें अष्टक - तिसरे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( वृत्त : चामर )
तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥
तारिलेस, तारतीस, तारशील, पातकी
अपरोक्ष साक्ष देति हे तुझेचि हात कीं
हेचि पाय हांसतील कौतुकें तुला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥२॥
एकदांहि दाविसी न आत्मरुप रेखडें
घालसी, सुलोचनांत राख खूपरे खडे
तारसी न मारसी न बारसीनं कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥३॥
मुख्य कार्यकारणांत तूंचि होसि वांकडे
दोष हा जिवाकडे न दोष हा शिवाकडे
आवघें तुझेंचि कृत्य हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके तुला ॥४॥
तूं दिनाचि माय साचि, होसि, कां ग मावशी
विद्यमान हें सुशील नाम कां गमावशी
नित्य मार शत्रुहातिं मारवीसि कां मला
हें विहीत काय, सांग, माय, रेणुके ! तुला ॥५॥
जो गुन्हा करी अधीक तो प्रितीस आगळा
मीं तसा कधीं न कांहिं बाइ ! कापिला गळा
हाचि न्याय अनुभवासि दाखला अला मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥६॥
रासभीण नारदादि आहिराजी वासना
जी अटोपली प्रत्यक्ष नाहिं राजिवासना
ती उनाड सांगतीस आटपावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥७॥
ओढती न पेरुं देति हात चालु चाडिचे
दुष्ट काम - क्रोध मांग जातिचे लुचाडिचे
त्यांचि पाठ रखितेस हें कळोनि ये मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥८॥
काय जन्म घातलासि, लाविलीस काळजी
काळजांत इंगळीच खोंचलीस काळ जी
ही जराचि धाड धाडलीस खावया मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥९॥
काय स्वस्थ बैसलीस मूळपीठपर्वतीं
काय घातलासि हा अनाथ देह कर्वतीं
काय लोटलेंसि घोर दुःखसागरीं मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१०॥
काय लीहिलेंसि दैविं गर्भवास सोसणें
काय दीधलेंसि जन्म - मृत्युलागिं पोसणें
काय लाविलेंस नित्य तोंड वासणें मला
हें विहीत काय, सांग माय रेणुके ! तुला ॥११॥
आदि मध्य - आवसानिं सर्व विश्व चाळसी
होसि तूं तरुण, वृद्ध, बाळ खेळ खेळसी
विष्णुदास व्यक्त नाम रुप गुण कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके तुला ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP