( वृत्त : शार्दूंलविक्रीडित )
श्रीअंबे ! जय रेणुके ! गुणनिधे, सौभाग्य सूवासिनी ।
मुक्तालंकरणें सुगंध सुमनें, श्रीमूळ पीठासनी ॥
आनंदें बसलीस खुंटुनि भवांबोधींत जैसी तरी ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥१॥
दुःखाचे वरच्यावरी ढसळती, अंगावरी पर्वत ।
चिंतेचा दिनरात्रही करकरा, वाजे शिरीं कर्वत ॥
आशा वाढत चालली स्थुळ जशी, जीर्णोदरीं पान्थरी ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥२॥
माते ! मुख्य तुं सूत्रधार तुझिया, सूत्रें अम्ही माकडें ।
आहों नाचत सत्य लाविसि बळें, कां दोष आम्हांकडे ॥
अज्ञानी म्हणवून देशि कशि तूं, लोटोनि दुःखांतरीं ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥३॥
थोरांच्या पदरांत चूक दुबळें, घालूं नये घालणें ।
संतापें भलतें प्रसंगिं अगळें, बोलूं नये बोलणें ॥
ही बुद्धी कळते परंतु सलतें, पोटामधें कातरी ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥४॥
जों जों मी करितों विनंती जननी ! तों तों कठोराधिक ।
होशी यास्तव वाटतो खचितची, संसार सारा धिक ॥
माझी कांहिं दया बया, तुज नये, वाटे मनीं खातरी ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥५॥
अद्यापी निगमादि व्यासवचनें, नाहीं क्षिती सोडिली ।
अद्यापी पतितांचि वाट तरण्याची नाहिं कीं मोडिली ॥
अद्यापी मज पावसी न स्तवितां, आली जरा सत्तरी ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥६॥
काढावें परि कर्दमांत पडल्या, मागें करुं ने हत ।
शिक्षा देउनि बाळकासि म्हणणें, कोपें अईनें हत ॥
दुःखिष्टासि न दुःख देति कळते, खोंचूनि वर्मांतरीं ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥७॥
अंबार्धक्षण पादपंकज मला, तूं दाखवी एकदां ।
कल्पांतीं म्हणणार नाहिंच पुन्हां, मी संकटीं ये कदां ॥
कोंडूनी ह्रदयांत ठेविन जशी, विद्युल्लता अंतरीं ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥८॥
विष्णूदास म्हणे जिच्या निजकृपें मात्रा पदें लाभलीं ।
नाहीं कोण म्हणेल पामर अशा, त्या जन्मदेला भली ॥
माते, बोलविसी तुं बोल म्हणुनीं, राहूनिया अंतरीं ।
भो नारायणि ! माय काय तुजला, आतां म्हणावें तरी ॥९॥