( वृत्त : पृथ्वी )
श्रीमंत गुणवंत तूं, सदय मंगलालंकृत ।
पसंतिस तुझ्या नये, स्तवन दूबळें प्राकृत ॥
निजस्तवनिं टेकिलीं, पर्दि सहस्त्रही मस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥१॥
अशुद्ध स्तवनाक्षरें, म्हणुनि बोबडीं तोतरीं ।
तुला न रुचती जरी, समुळ हीं खुडीतों तरी ॥
मुकेंचि स्तन चाखितें, आरडतें भुकें बोलकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥२॥
जगीं न मिळली मला, सुशिल संगती वाटती ।
पुढें मज न चालवें, मनिं तुझी भिती वाटती ॥
परंतु तव चिंतनें, विविध जाळिं तूं पातकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥३॥
तुलाचि तुजसारखें, जननि नांव हें शोभलें ।
समान जगिं पाहसी, जड मुढादि ज्ञानी भले ॥
उदंड मज सारखें, पतित तारिले कौतुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥४॥
न देचि निजगुप्त तें, धन पिता कुपुत्रा - करीं ।
जगांत अथवा जसा, निजगृहांत कुत्रा करी ॥
परंतु जननी अधीं, अधिक देत त्या भातुकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥५॥
सुपात्रहि न वंचना, करि गुरुहि दत्तात्रय ।
तशीच गृहदैवतें, विविध देति तापत्रय ॥
तुलाचि खळ पातकी, पटति अंध पंगू मुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥६॥
निराश्रित मि लेंकरुं, तरि नको उपेक्षा करुं ।
तुझ्या भुवनिं जिंकिती, हंसति कल्पवृक्षा करुं ॥
कृपामृत झरे सदा, स्त्रवति नित्य आराणुके ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥७॥
तुझीं विमल पावलें, परम सुकृतें पाहिलीं ।
अनंदसरिता जळीं, विषयवासना वाहिलीं ॥
विशेष मम मस्तकीं, अभयदान दे हस्तकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥८॥
सुकीर्ति तुझि चांगली, अवडली अम्हां गावया ।
अशा धरुन मी अलों, उचित दान मागावया ॥
प्रसादफळ दे असें, सतत विष्णुदासा निकें ।
म्हणूनि तुजला अलों, शरण मी आई रेणुके ॥९॥