( वृत्त : शार्दूलविक्रीडित )
श्रीमातापुरवासिनी भगवती चिंतामणी शारदा
चिंतीतों तुज त्यासहीत नमितों श्रीसदगुरु नारदा
पावे सत्वर, श्रेष्ठ नाममहिमा जाणूनिया आपुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥१॥
जन्मापासुनि घोर पाप अवघें म्यां ठेविलें साधुनी
माते ! तूंचि पतीतपावन, मला सांगीतलें साधुंनीं
जाळी पातक यज्ञअग्नितनये, ही कापसाची तुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥२॥
कापाया निकरें जरी निजकरें तो राम धावे गळां
नाहींची जिव जाहला, तरि तुझा प्रेमांतुनी वेगळा
चित्तीं निर्ददयता तुझ्या न उमटे, कांटे न येती फुलां
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥३॥
अद्यापी मज कामक्रोध खळ हे शत्रू पहा गांजिती
अद्यापी तव नाम पावन कथा आभंग गंगा जि ती
अद्यापी नच उष्णता प्रकटली श्रीलक्ष्मीबंधुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥४॥
अज्ञानी पडलों आम्ही पतितची अन्याय केले, करुं
टाकावें तरि कां कुपोदरिंच तें जें नायके लेंकरुं
नाहीं विन्मुख जाहला रवि कधीं त्रासूनिया केतुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥५॥
आतां योग्य नव्हे कुदोष अमुचे चित्तामधें ठेवितां
केला नाहिंस कां विचार पहिला ऐसें करंटें वितां
श्रेष्ठत्वासि न ये परीस शिवल्या सोन्याचिया धातुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥६॥
हा बाई बसला कसा दगडसा दारीं ऋणाईत कीं
कांगाई करितो उदंडचि, नसे लज्जा तृणाईतकी
ऐसेंही म्हणतां मि बाई तुझिया या सोडिना पाउला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥७॥
तारी या व्यसनीं दिनासि अथवा मारी जगन्नायके
येथूनी उठ जा परी कुणिकडे हें बोलणें नायके
देवो दुग्ध किं उग्र माय विषही प्यावेचि लागे मुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥८॥
ऐसा पातकि शंकराहि न मिळे, भावार्थ यावा मना
नाहीं पालटलें त्रिविक्रमरुपें, जें नाम तें वामना
माझा त्याग कराल क्षारचि तुझ्या, सत्कीर्तिच्या सिंधुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥९॥
आनाथा प्रतिपाळिसी म्हणुनियां तूं नाथ नारायणी
श्रीव्यासादि शुकादि नारदमुनी, गाताति पारायणीं
विष्णूदास म्हणे तरी त्यजुं नये, पीतांबरें तंतुला
श्रीअंबे, जय रेणुके, जननि हे, कां राग आला तुला ॥१०॥