( वृत्त : शार्दूलविक्रीडित )
झालों जानकिच्याविणें थकित मी आरण्य कंठावया
कौसल्येपरि धांवुनी आलिस या रामासि भेटावया
हा - हा ! काय अजी जगांत जननी त्वां धन्य केलें मला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥१॥
कौसल्येहुनि कैकयी जननिचा आभार हा केवढा
झाला दर्शनलाभ निश्चय जिच्या कोपामुळे एवढा
केलें सत्य तिनें कृतार्थ मजला, या दाविले पाउला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥२॥
आलों मी तुज हाननार्थ मुळ हें स्त्रीबुद्धिनें वांकुडें
केलें कर्म विशेष लावुं कसला मी दोष देवांकडे
आतां या परिणामिं भोगहरणा मी भोगितों आपुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥३॥
रे वत्सा, उपकार आठवुं किती मी पाउला - पाउलीं
भेटाया तुजकारणें मज आली विश्वाचि ही माउली
धालों दर्शनिं मीहि चातक जसा पाहूनि मेघांबुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥४॥
हें चिंताभयशोकदायक वनं येथें तुकाई बरं
ऐसी कां सजलीस वल्कलपटें सोडून पीतांबर
एकाकी दुर काननीं आलिस कां सोडूनिया शंभुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥५॥
ऐशाही परि वल्कला विनटली जी आदिमाया कदा
दावी या नयनांसि चंद्रवदना, ती जानकी एकदां
अंबे, सत्वर हो प्रसन्न मजला या पूरवी हेतुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥६॥
तेव्हां ती शिववल्लभा रघुविराच्या बोलिला मानवी
लौकीकास्तव पूर्णब्रह्म प्रभु हा दावी लिला मानवी
आला जानकिच्या मिसें क्षय कराया राक्षसांच्या कुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥७॥
सीतेचें रुप त्यागुनी निजरुपें हेमाद्रिची बालिका
श्रीरामापुढें ठाकिली निलग्रिवाच्या कंठिंची मालिका
पाहूनी तिजला रघूविर म्हणे ढाळीत प्रेमाश्रुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥८॥
येथें स्वस्थपणें निरंतर रहा भक्तांसि तारावया
व्हावें साह्य भवानिमाय, मजला दुष्टासि मारावया
माझी जानकि शीघ्र भेटवि मला सिद्धांत हा ईतुला
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥९॥
ताराया पतितासी राहिली तशी तेथेंचि अद्यापिती ।
दुर्बुद्धीच तिच्या कथामृतरसा टाकून मद्या पिती ॥
विष्णूदास म्हणे ललाट कधि त्या लागेल पादांगुलां ॥
माझा हा प्रणिपात आइ, तुळजाबाई, तुकाई तुला ॥१०॥