आतां प्रथम या समासोक्तीचें उदाहरण :---
“करस्पर्शानें [(१) किरणाच्या स्पर्शानें व (२) हाताचा स्पर्श करून] मिटलेल्या (तोंड मिटून घेतलेल्या) पदमिनीला (१) कमलिनीला (२) (अत्यंत सुंदर स्त्रीला)] विबोधित करणारा [(१) विकसित करणारा (२) (जागी करणारा) (१) लाल रंगानें (पूर्ण अनुरागानें) युक्त असा भास्कर (सूर्य) प्रात:कालीं उत्कर्षशाली होतो.”
ह्या ठिकाणीं श्लोकांतील शब्दांच्य केवळ अभिधाशक्तीनेंच “किरणांच्या स्पर्शानें सूर्य मिटलेल्या कमलिनीला विकसित करणें या क्रियेला अनुकूल अशा व्यापारानें युक्त असलेल्यांशीं अभिन्न होत्साता, उत्कर्ष पोवतो :--- ” असा सरळ वाक्यार्थ प्रथम प्रतीत होतो. (हा प्रकृत वाक्यार्थ, केवळ शब्दशक्तीनेंच प्रतीत होतो ह्यांत मतभेद कुणाचाच नाहीं;) आतां ‘हाताचा स्पर्श करून, विशेष प्रकारच्या नायिकेची समजूत काढण्याला अनुकूल अशा व्यापारानें युक्त असलेल्याशीं अभिन्न (असा नायक)’ असा दुसरा अर्थ (म्ह० अप्रकृत अर्थ), प्रकृत व अप्रकृत अर्थाशीं संबद्ध असलेल्या एकच म्ह० त्याच शब्दशक्तीनें (अभिधाशक्तीनें) प्रतीत होतो म्हणा; अथवा व्यंजनेनें प्रतीत होता म्हणा - कांहीं म्हणा (सर्वथैव), हा दुसरा (म्ह० अप्रकृत) अर्थ प्रतीत होतो, हें निश्चित. हें प्रतीत होणारे दोन वाक्यार्थ गाईच्या डाव्या व उजव्या शिंगाप्रमाणें, एकमेकांशीं अत्यंत अलग आहेत असें मानलें तर, भगवान् सूर्याचें प्रेमी नायक होणें व कमलिनीचें नायिका होणें :--- ही जी सर्वांच्या अनुभवानें सिद्ध झालेली गोष्ट ती, येथील दोन अर्थ परस्परांशीं संबद्ध नाहींत असें मानण्याच्या विरुद्ध जाऊं लागेल. शिवाय दोन (प्रधान, मुख्य,) स्वतंत्र वाक्यार्थ एकाच वाक्यापासून होतात असें मानलें तर, वाक्यभेद हा दोष होण्याचा प्रसंग येईल. (एकाच वाक्यांतून दोन स्वतंत्र अर्थ निघणें हा व्युत्पत्तिशास्त्रानें दोष मानला आहे.) आतां जर ह्या दुसर्या अर्थाचा, प्रकृत कर्ता जो भास्कर त्याच्यावर आरोप केला तर, कमलिनीच्या विकासाचा कर्ता व नायिकेची समजूत काढणारा सूर्य, असा म्ह० एकाच सूर्यावर दोन प्रकार (धर्म अथवा विषय) असा (सूर्याचा) विषयताशाली बोध होऊं लागेल. (म्ह० एकाच सूर्यावर कमलिनीप्रबोधकर्ता व नायिकानुनयकर्ता असे दोन धर्म येऊन पडतील; पण पूर्वीं (सूर्याच्य ठिकाणीं नायकाची प्रतीति न होण्याची) जी अनुपपत्ति आम्ही सांगितली होती, तिचा मात्र परिहार होणार नाहीं. (अर्थात वाक्यभेदाचा दोष असें करण्यानें तुम्ही घालविला हें कबूल). आतां येथें नायिकेची प्रतीति (कमलिनीचे ठिकाणीं) श्लेषमूलक अभेदाध्यवसानाच्या योगानें होऊं शकते, (असें तुम्ही म्हणाल) तरीपण, (ज्या ‘भास्कर’ पदाचे दोन अर्थच होऊं शकत नाहींत त्या) श्लेषरहित भास्कार पदानें उपस्थित झालेला जो सूर्य हा अर्थ, त्याला नायकत्वाचा मुळींच स्पर्श झालेला नाहीं; (तो नायक आहे अशी तर मुळींच प्रतीति होत नाहीं) आणि शिवाय येथील पदमिनी ह्या श्लिष्टा शब्दाऐवजीं नलिनी हा (कमलिनीवाचक श्लेषरहित) शब्द घातला तर, त्या निलनीच्या ठिकाणीं नायिकेची (म्ह० नायिकात्वाची) प्रतीति तरी कशी होणार बरें ? तेव्हां (असेंच म्हटलें पाहिजे कीं) विशेषणें समान असण्याच्या बळावर प्रतीत झालेला जो अप्रकृत वाक्यार्थ तो (प्रथम) स्वत:ला अनुकूल असा नायिका वगैरेच्या अर्थाचा आक्षेप करतो, (तो नायिकादिकाचा अर्थ अन्यथानुपपत्तिरूप प्रमाणानें घेतला जातो), व त्या आक्षिप्त अर्थानें तो अप्रकृत वाक्यार्थ परिपुष्ट होतो; (शृंगारार्थाला अनुकूल अशा सर्व अंगभूत अर्थांनीं परिपूर्ण होतो.) व मग त्या अप्रकृत अर्थाचे अवयव प्रकृत अर्थाच्या अवयवाशीं तादात्म्य पावल्यानें स्वत: तो अप्रकृत अर्थ, प्रकृत अर्थाशीं अभिन्न होऊन राहतो. (अभेद संबंधानें राहतो.) म्हणून नायिकेची समजूत काढणार्या नायकाशीं अभिन्न असा कमलिनीचा विकास करणारा सूर्य, असा येथें शाब्दबोध होतो. आता तो अप्रकृत अर्थ प्रकृत अर्थाशीं एकरूप झाला तरच तो परिणामअलंकारांतल्याप्रमाणें (म्ह० अप्रकृत अर्थ प्रकृतरूप होऊन) प्रकृत अर्थानें दाखविलेल्या व्यवयहाररूपी कार्याला उपयोगी पडतो. व स्तव: अप्रकृतार्थरूपानें रसादिकाल उपयोगी पडतो. (अशारीतीनें येथें होणार्या समासोक्तींत) अप्रकृतार्थ हा निराळ्या (म्ह० प्रकृतार्थवाचक शब्दाहून निराळ्या) शब्दांनी उपस्थित होत नसल्यानें. दोन स्वतंत्र (आपाल्या शब्दांनीं प्रतीत होणार्या) वाक्यार्थांचा अभेदसंबंध ज्यांत असतो अशा वाक्यार्थपकाहून या समासोक्तीचा फरक आहे. (समासोक्तींत एकाच वाक्यांतून दोन अर्थ निघतात, रूपकांत दोन स्वतंत्र वाक्यांतून दोन अर्थ निघतात हा फरक.) आणि पदार्थ रूपकाहून तर, समसोक्तीचा फरक स्पष्टच आहे. (कारण समासोक्तींत दोन व्यवहारांचा अभेदसंबंध असतो; दोन पदार्थांचा नसतो.) आतां आक्षेपानें घेतलेल्या अर्थानें समासोक्तीची सिद्धी होत असल्यानें (म्ह० आक्षिप्त नायिका व नायकरूप अर्थ, हा समासोक्तीचा आवश्यक घटक होत असल्यानें) वाक्यार्थ श्लेषाहून (उदा० :--- संभूत्यर्थं सकल० इत्यादि श्लेषप्रकरणांतील श्लोकाहून)समासोक्तीचा भेद आहे. एवंच (वाच्यार्थाकरतां व अप्रकृतार्थाकरतांही) शक्ति व (नायक नायिकाची प्रतीति होण्याकरतां) आक्षेप या दोन उपायांनींच (समासोक्तीला आवश्यक अशा) सर्व सर्थाच्या प्रतीतीचें काम भागतें. (त्याकरतां व्यंजनाव्यापार वगैरे कांहीं मानण्याची जरूर नाहीं.) असा भामह, उद्भट वगैरे प्राचीन आलंकांरिकांचा अभिप्राय.