समासोक्ति अलंकार - लक्षण १४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या श्लोकांत, उपमासाधक किंवा रूपकाला बाधक असें एकही गमकप्रमाण नसल्यानें संकरालंकार मानणारांच्या मताप्रमाणें येथें संदेहस्वरूप एकदेशविवर्ति (उपमा व रूपक यांचा) संकरालंकरच आहे.  पण हें संकराचें मत ज्यांना मान्य नाहीं. त्यांच्या मतीं येथें उपमित समास घेतल्यास (या समासाचे भान झाल्यास) एकदेशविवर्तिंनी उपमा होते; व विशेषणसमास घेतल्यास एकदेशविवर्ति रूपक होतें. अशी ही पहिली योजना मान्य करून तिनें अप्रकृतार्थाची प्रतीति होत असल्यानें, दुसर्‍या तर्‍हेची योजना केल्यानें होणार्‍या  ‘परिफुल्लाब्जानीव नयनानि’ (प्रफुल्ल कमळाप्रमाणें डोळे) या उपमागर्भ विशेषणांचा उपयोगच नसल्यानें (म्ह० विशेषणें व्यर्थच होत असल्यानें, कारण त्यांचें काम, पहिल्या योजनेनें होणार्‍या एकदेशविर्तिंनी उपमा अथवा एकदेशविवर्ति रूपक यापैकी एकानें भागतें.) येथें समासोक्ति उभीच राहू शकत नाहींत. आतां, वरील श्लोकांतील चौथ्या चरणाऐवजीं, ‘शरद्वर्षासखी बभौ’ (वर्षा ऋतूची मैत्रीण शरद् शोभली) असा चौथा चरणा केला तर मात्र, वर्षासखी हें केवळ शरदलाच लागू पडणारें विशेषण यांत आलें असल्यानें, कमल, चांदणें, हंस हीं समासातील पहिलीं पदें ज्यात प्रधान आहेत असा उपमितसमासच येथें मानणें भाग आहे; व तो उपमितसमास घेऊस होणार्‍या आणि प्रथम (वाचकांच्या पुढें) येणार्‍या व जिच्यांत डोळें, हास्य, हार या पदांनीं आक्षिप्त होणारें कामिनी (नायिका) रूपी उपमान आहे, अशा एकदेश विवर्तिनी उपमेनें येथें काम भागतें, हें एकदां आम्ही वर सांगितलें असलें तरी रसिकांच्या समाधानाकरतां पुन्हा सांगतो. (म्हणजे येथें समासोक्ति नाहीं हें आमचें स्पष्ट मत.)
“नंतर शरद चंद्राला बिलगली असतां (शरत्सुंदरीनें चंद्राला आलिंगिलें असतां) जिच्यांत कटाक्षाप्रमाणें असणारा विजेचा चमकारा नाहींसा झाला आहे अशी वर्षा संपली. (विजेप्रमाणें शोभणार्‍या कटाक्षानें युक्त अशी वर्षासुंदरी क्रोधानें निघून गेली); ज्यांचे स्तन लोंबू लागले आहेत अशा कोणत्या स्त्रियांचा सौंदर्यरूपी गुण नाहींस होत नाहीं ? (परिभ्रष्टपयोधरा हें विशेषण वर्षाऋतूकडे लावतांना त्याचा, ‘ज्यांतील मेघ पाणी पडल्यानें विरून गेले आहेत’ असा अर्थ करावा). ह्या कुणाच्या तरी पद्यांत (प्रावृट)  वर्षा या विषयावर एकदेशविवर्तिरूपक घेऊन उत्तरार्धांतल्या ‘स्त्रियांच्या’ या पदार्थाची सिद्धि होऊन अर्थान्तरन्यास चांगला जुळतो. (रुपक घेतलें तरच अंगना ह्या उपमानाचें प्राधान्य होतें, नाहींतर प्रावृट ह्या उपमेयाचें प्राधान्य झालें असतें). आतां यांतील प्रथम चरणांत उपगूहन (बिलगणें) ह्याच्याशीं आलिंगनाचें साम्य असल्यामूळें (प्रकृतावर अप्रकृत आलिंगनाचा समारोप करून) समासोक्ति होत असेल तर होऊ दे. (त्याला आमची हरकत नाहीं).

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP