समासोक्ति अलंकार - लक्षण ५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
आतां अलंकारसर्वस्काराच्या आज्ञेप्रमाणें वागणारे जे कुवलयानंदकार त्यांनीं (समासोक्तीचे बाबतींत) पूर्वपक्ष मांडून सिद्धांत सांगितला आहे, तो असा :--
“येथें (समासोक्तींत) विशेषणांच्या साम्यावरून अथवा सारूप्यावरून अप्रस्तुतव्यवहाराची जी प्रतीति होते ती प्रकृत विशेष्यावर(धर्मींवर) त्या अप्रकृतव्यवहाराचा आरोप करण्याकरतांच होते; कारण अजिबात प्रस्तुत अर्थाशीं संबंध नसणारा अर्थ, कवीच्या अभिप्रायाचा विषय होऊच शकत नाहीं. तेव्हां समासोक्तींत (प्रस्तुत धर्मीवर) अप्रस्तुतव्यवहाराचा समारोप हा चमत्काराला कारण होतो; रूपकांतयाप्रमाणें (येथें) प्रस्तुत धर्मीवर अप्रस्तुत धमींचा आरोप चमत्काराला कारण होत नाहीं. ‘मुखं चंद्र:’ ह्या रूपकाच्या वाक्यांत मुखावर चंद्रत्वाचा आरोप करण्याला कारण जो चंद्र शब्द तो मुखाच्या बरोबर जसा वाक्यांत सांगितलेला आहे, (समभिव्याहार) तसा ‘रक्तश्चुम्बति चंद्रमा:’ या समासोक्तीच्या वाक्यांत (उदाहरणांत) चंद्रावर जारत्वाचा आरोप करण्याला कारण होणारा जार हा ‘शब्द’ चंद्राच्या बरोबर वाक्यांत सांगितलेला नाहीं. आतां ‘निरीक्ष्य विद्युन्नयनै: पयोदो मुखं निशायामभिसारिकाया: ।’ ह्या ठिकाणीं, निरीक्षण ह्या क्रियेला अनुकूल असा श्लोकांत केलेला नयनाचा उल्लेख ज्याप्रमाणें, मेघावर, पाहणार्या पुरुषाचा आरोप सूचित करतो (म्ह० ज्याप्रमाणें, नयनाचा उल्लेख हा द्रष्ट्रात्वाच्या आरोपाचा गमक आहे सूचक आहे,) त्याप्रमाणें ‘रक्तश्चम्बति चंद्रमा:’ ह्या वाक्यांत चंद्रावर जाराचा आरोप करण्याकरतां गमक असा कोणताही शब्द नाहीं, त्याचप्रमाणें :---
“त्वय्यागते किमिति वेपत एष सिन्हु: ।
त्वं सेतुमन्थकृदत: किमसौ बिभेति ॥”
या श्लोकांत, सेतु बांधणें व समुद्रमंथन करणें हीं जीं विष्णूची कार्ये तीं, राजाचे ठिकाणीं विष्णुत्व मानण्याला गमक आहेत; त्याप्रमाणें,
“रक्तश्चम्बति चन्द्रमा:’ या वाक्यांत चंद्रावर जाराचा आरोप करण्याकरतां कांहींच गमक नाहीं. तेव्हां समान विशेषणांनीं सुचविलेला जो अप्रस्तुत व्यवहार त्याचा (प्रस्तुत धर्मींवर) आरोप हाच येथें चमत्काराला कारण आहे. आतां समान विशेषणांनीं प्रतीत होणारे दोन्हीही अर्थ येथें सारखेच प्रधान आहेत; तरीपण या दोहोंपैकीं कोणत्यातरी व्यवहारच्या (अर्थाच्या) आश्रयभूत धर्मीचे ठिकाणीं कोणत्यातरी दुसर्या व्यवहाराच्या (अर्थाच्या) आश्रयभूत धर्मीचे ठिकाणीं कोणत्यातरी दुसर्या व्यवहाराचा आरोप तर करणें आवश्यक आहे; तेव्हा शब्दानें सांगितलेला जो प्रकृतव्यवहाराचा (आश्रय) धर्मी, त्याचे ठिकाणीं अप्रकृतव्यवाहाराचा समारोप करणेंच योग्य आहे. आतां तो अप्रकृतव्यवहार केवळ स्वत:च्या रूपानें (म्ह० नुसताच) ज्ञान असतांना त्याचा (प्रकृत धर्मीवर) आरोप केला तर त्यांत कांहींत मजा नाहीं; म्हणून अप्रस्तुत धर्मी जो जार (अथवा कामुक) वगैरे, त्याच्या संबंधानें युक्त (म्ह० कामुकविशिष्ट) म्हणून जाणलेल्या त्या अप्रस्तुत व्यवहाराचा, प्रकृत धर्मीवर आरोप केला जातो; कारण तसें करणें रसाला अनुकूल आहे. कामुक्त वगैरे अप्रकृत धर्मीची शब्दानें उपस्थिति झालेली नसली तरी चुंबन वगैरे (वाक्यांतील) शब्दांनीं तो धर्मी व्यक्त झाला असल्यानें तो अप्रकृत व्यवहाराचें विशेषण होऊ शकतो. तेव्हां “अयमैन्द्रीमुखं पश्य रक्तश्चुम्बति चंद्रमा:’ [हा बघ, चंद्र इन्द्रदिशेच्या (म्ह० इन्द्रपत्नीच्या) प्रारंभीच्या स्थानाला (म्ह० मुखाला) बिलगत आहे. (चुंबन घेत आहे.)] या वाक्यांत जारविशिष्ट जो ऐन्द्रीमुखचुंबन व्यवहार त्याचा चंद्र आश्रय आहे असाच शाब्दबोध होतो.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP