पण अलंकारसर्वस्वकार (समासोक्तीचे बाबतींत) असें म्हणतात :--
“विशेषणें सारखीं असल्यानें (म्ह० दोहोंकडे लागूं पडत असल्यानें) त्यावरून सूचित होणारा अप्रस्तुत अर्थ, प्रस्तुताचा अवच्छेदक (धर्म) म्हणून राहतो; व तो अप्रस्तुत अर्थ प्रस्तुताचा अवच्छेदक धर्म होत असल्यानें (म्ह० अप्रस्तुत अर्थ धर्म होत असल्यानें व धर्मी होत नसल्यानें) प्रकृतावर (म्ह० प्रकृतधर्मीवर) येथें अप्रकृत व्यवहाराचा आरोप आहे असें समजावें; अप्रस्तुत धर्मीचा (प्रस्तुतधर्मीवर) अभेदारोप येथें आहे असें समजूं नये. अभेदारोप केल्यास प्रकृतधर्मी, अप्रकृतधर्मीनें अवच्छादित (म्ह० उपरञ्जित) होईल व त्यामुळें प्रकृताशीं (प्रकृतधर्मीशीं) तो अप्रकृतधर्मी अभिन्न होऊन, येथें रुपक होऊं लागेल.”
हें त्यांचें म्हणणें केवळ बोलण्यांतच सुंदर आहे. (पण खरें म्हणजे चुकीचें आहे.) (आम्हाला येथें असें त्यांना विचारावेंसें वाटतें कीं,) तुम्ही जो येथें प्रकृत धर्मीवर अप्रकृत व्यवहाराचा आरोप केला जातो म्हणून म्हणतां, तो आरोप (१) नायकादिक जो धर्मी त्याच्या धर्मित्वानें विशिष्ट अशा अप्रकृतव्यवहाराचा, प्रकृतधर्मीवर, केला जातो, कां (२) अप्रकृत धर्मित्वानें अविशिष्ट अशा अप्रकृतव्यवहाराचा, प्रकृतधर्मीवर केला जातो ? पैकीं पहिला पक्ष बरोबर नाहीं :--- कारण तो घेतला तर चंद्रादिक (प्रकृतधर्मी), नायकाच्या (चंद्रसद्दस) व्यवहाराचा आश्रय होत असल्यानें त्याचे नायकाशीं फक्त साम्य सिद्ध होईल. (अभेद सिद्ध होणार नाही :--- आणि आम्हाला तर येथें चंद्राचा व नायकाचा अभेद असायला पाहिजे आहे.) आणि श्लेष वगैरेवर आधारलेल्या अभेदाध्यवसानानें, प्रकृत व अप्रकृत व्यवहारांत अभेद सांगूं पाहाणार्या कवीला तें साम्य नको आहे. त्याला पाहिजे आहे चंद्राचें नायक्त्व. (म्ह० चंद्राशीं नायकाचा अभेद कवीला इष्ट आहे.) तें चंद्राचें नायक होणें, तो नायक अप्रकृतव्यवहाराचें (नुसतें) विशेषण झाल्यास, सिद्ध होणार नाहीं. शिवाय ‘निशामुखं चुम्बति चन्द्र:’ या वाक्यांत (तुमच्या मताप्रमाणें) चंद्रावर नायक व्यवहाराचाच फक्त समारोप (आरोप) आहे; चंद्रावर नायकत्वाचा आरोप (तुमच्या मतीं) नाहीं. याचप्रमाणें तुल्य न्यायानें (दोहोंची सारखीच स्थिति असल्यानें,) रात्रीवर नायिकाव्यवहाराचाच फक्त समारोप आहे, नायिकात्वाचा आरोप नाहीं: म्हणजे अशा रीतीनें नायिका विचारांत न घेतां (म्ह० तिला सोडून, कारण तिचा आरोप झालेला नाहीं) केवळ मुखचुंबनच चंद्रावर प्रतीत होणार (तुमचें मत मानलें तर); आणि केवळ मुखचुंबनप्रतीतींत सुंदर असें कांहीं नाहीं. मग नायकाच्या असाधारण (चुंबनादि) व्यवहाराचा संबंधच येत नसल्यानें त्याचा चंद्रावर आरोप करण्यांत फायदा काय ? आतां निशा यांतील स्त्रीलिंगानें निशेचें नायिकात्व सूचित होतें, असें तुम्हांला वाटत असेल, (दिसत असेल) तर चंद्र शब्दांतील पुल्लिंगानें चंद्राचें नायकत्व सूचित झालेलें तुम्हांला दिसूं दे कीं ! (तें कां नाहीं तुम्हाला दिसत ?) आतां वरील पक्षांपैकीं दुसरा पक्षही बरोबर नाहीं; कारण नायकत्वविशिष्ट नसलेलें असें हें चुंबन आहे, असें ज्ञान झाल्यास, त्याम्त कांहींच मजा नाहीं, शिवाय, ‘तितीषुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम्’ या निर्दशनेहून, समासोक्तीचा (स्पष्ट) फरक पाडण्याकरतां, आम्ही सांगितलेला या दोहोंतला निराळेपणा स्वीकारणेंच योग्य आहे. बाकीचे आतांच यापुढें आम्ही सांगणार आहों.