समासोक्ति अलंकार - लक्षण १३
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“तुझा क्रोध विषाप्रमाणें आहे; तुझी दया अमृतासारखी आहे; तुझी कीर्ति चंद्रासारखी आहे; व तुझे योद्धे मगरांप्रमाणें, भयंकर आहेत.” ह्या ठिकाणीं दुसरा इलाज नसल्यानें, (‘तूं - म्ह० राजा - समुद्राप्रमाणें आहेस.’ या अंशांत) एकदेशविवर्तिं उपमा, उद्भटालासुद्धां स्वीकारावी लागली आहे. तेव्हां, आवश्यक म्हणून, सिद्ध असलेल्या एकदेशविवर्तिउपमेनें ‘दन्तप्रभापुष्प०’ या श्लोकांतील (अप्रकृताच्या प्रतीतीची) उपपत्ति लावतां येत अल्यानें (त्या उपपत्तीकरतां) समासोक्तीच्या दुसर्या एखाद्या प्रकाराची कल्पना करणें योग्य नव्हे. तेव्हां, औपम्य पोटांत असलेल्या विशेषणावर आधारलेल्या समासोक्तीचा प्रकार मानणें जुळत नाहीं. ज्या ठिकाणीं श्लिष्ट विशेषणें अथवा शुद्ध (म्ह० अश्लिष्ट) साधारण विशेषणें यांच्याबरोबरो एखादें औपम्यगर्भ विशेषण आलें असेल त्या ठिकाणीं जरी समासोक्ति अलंकार होत असला तरी, तो औपम्यगर्भ विशेषणांनीं उठविलेला असा समासोक्तीचा तिसरा प्रकार होऊं शकत नाहीं; कारण अशा ठिकाणीं औपम्यगर्भ विशेषणांना स्वतंत्र विषयच मिळालेला नसतो. उदा० :--- “निर्मल आकाशामुळें जिची शोभा मनोहर आहे; जिनें थोडयाशा तारका दाखविल्या आहेत, हंसांच्या पंक्तींचा हार जिनें पेहेरला आहे अशी ही शरद् (ऋतु) अत्यंत उत्कर्षशाली आहे.”
या श्लोकांतल्या पूर्वार्धांतील श्लिष्टविशेषणांनीं झालेली जी समासोक्ति तिला, उत्तरार्धांतील औपम्यगर्भ विशेषणानें, ज्याप्रमाणें एखाद्या विद्वानानें प्रथम एखादी कोटी करावी व त्याची री ओढणार्या एखाद्या मूर्खानें त्याला अनुमोदन द्यावें त्याप्रमाणें, अनुमोदन दिलें आहे. वरील श्लोकांतल्या पूर्वार्धांत, ‘दत्तानन्दा समस्तानां प्रफुल्लोत्पलमालिनी ।’ (सर्वांना आनंद देणारी व पूर्ण उमललेल्या कमळांची माळा घातलेली) असा फरक केला तर, ह्यांत शुद्ध (अश्लिष्ट) साधारण विशेषणावर आधारलेली समासोक्ति होईल. अशा रीतीनें :---
“प्रफुल्ल कमळें हेच जिचे डोळे आहेत, (असें रूपक) (अथवा डोळ्यांप्रमाणें जिच्यावर कमळें आहेत, अशी उपमा) चांदणें हेंच जिचें मधुर हास्य आहे (हें रूपक) (अथवा हास्याप्रमाणें, जिच्यांतलें, चांदणें आहे अशी उपमा) हंसांची पंक्ति हीच जिचा हार आहे (हें रूपक) (अथवा हाराप्रमाणें जिच्यांत हंसाची रांग आहे अशी उपमा) अशी शरद् अत्यंत उत्कर्ष शाली आहे.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP