आतां कुवलयानंदांत, “सारूप्यामुळेंही म्हणजे सद्दश व्यवहारावरूनही) समासोक्ति होत असलेली दिसते. उदा० :---
“पूर्वीं जेथें नद्यांचा प्रवाह होता तेथें आज वाळवंट दिसत आहे. वृक्षांच्या विरळपणांत व गर्दपणांत उलटापालट होऊन गेली आहे. फार दिवसांनीं पाहिलेलें हें अरण्य मला निराळेंच वाटत आहे; फक्त डोंगरांची बैठक पाहून, तेंच हें अरण्य आहे अशी मनाची खात्री होते,” [उत्तरराम० २।२७]
या शोकांत, अरण्याचें वर्णन प्रस्तुत असून त्या अरण्याशीं साद्दश्य असल्यामुळें, घरंदाज लोकांचा पैसा, संतति वगैरेंच्या समृद्धीची व टंचाईची उलटापालट ज्यांत झाली आहे अशा (एखाद्या) गावाच्या अथवा शहराच्या वृत्तांताची प्रतीति होते.” असें जे म्हटलें आहे, तेंही चूक आहे. समासोक्तीचा प्राण जें विशेषणाचें साम्य तेंच मुळीं नसल्यानें समासोक्ति येथें होतच नाहीं. तुम्ही (कुलवल्यानंदकार) म्हणाल :--- “विशेषणांच्या साम्यामुळें (अथवा) (व्यवहाराच्या) साद्दश्यामुळें ज्या ठिकाणीं, अप्रस्तुतव्यवहार, प्रस्तुतानें सूचित होतो, ती समासोक्ति, असें आम्ही समासोक्तीचें लक्षण करूं.” पण असें म्हणणें योग्य नाहीं. समासोक्तींत प्रकृतवृत्तांताशीं अप्रकृतवृत्तांत अभेदसंबंधानें राहतो ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. तुम्ही (म्ह० कुवलयानंदकारांनीं) सुद्धां, ‘प्रकृतधर्मीवर अप्रकृतव्यवहाराचा आरोप (समासोक्तींत) केला जातो,’ असें म्हटलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें (त्या द्दष्टीनें पाहतां) येथें प्रवाह व वृक्ष यांच्यांतल्या उलटापालटीशीं, पैसा व संतति यांची उलटापालट अभेदसंबंधानें राहते, अशी प्रतीति होत नाहीं, ( करण तुमच्याच म्हणण्याप्रमाणें या दोन व्यवहारांत अभेद नसून साद्दश्य आहे), आणि वनावर (वन ह्या धर्मीवर) पण धनसंतानविपर्यास ह्या अप्रकृतव्यवहाराचा आरोप प्रतीत होत नाहीं. आतां एरवीच्या समासोक्तीहून, ही साद्दश्यावर आधारलेली समासोक्ति निराळ्या प्रकारची असली तरी ही समासोक्ति तर खरीच, असें शपथेवर सांगत असाल तर, बाकीचें अलंकारही समासोक्तींच्या पोटांत या कीं दडपून ! (संकोच कशाला ?)