उदाहरणार्थ :--- “चकोरांच्या डोळ्यांना आनंद देणारें, कमलांच्या आल्हादाला (विकासाला) कारण, व अंधाराचा धुव्वा उडविणारे असें तुझें सुंदर मुख आहे.”
यांत ‘सुंदर’ हें उभयसाधारण विशेषण असलें तरी व्यंग्यरूपकच आहे. आतां कुठें तें व्यंग्यरूपक गुणीभूत असतें, तर कुठें प्रधान असतें हा विषय निराळा. (मग हरएक ठिकाणीं समासोक्तीचें जागीं व्यंग्यरूपकच आल्यास समासोक्तीला स्वतंत्र जागा कुठे राहिली ? यावर उत्तर :--- ) आतां साधारण विशेषणांच्या योगानें होणार्या विशेषणसाम्यमूलक समासोक्तीचा विषय ‘अन्धेन पातभीत्या’ हा पूर्वी आम्ही समासोक्तीचें उदाहरण म्हणून दिलेला श्लोक असल्यामुळें, समासोक्तीला स्वत:ची जागा (विषय) उरली नाहीं असें म्हणूं नका; कारण त्या श्लोकांत अप्रकृताच्या असाधारण धर्मांचा आरोप न करतांही फक्त साधारण विशेषणांच्या बळावरच अप्रकृतार्थाची प्रतीति झाली आहे. वरील विवेचनावरून, “अशा रीतीनें साधारण्यानें होणार्या समासोक्तींत, विशेषणांचें साम्य असलें तरी अप्रकृताच्या (असाधारण) धर्मरूपी कार्याच्या (अवश्य) असणार्या समारोपावाचून अप्रकृताच्या व्यवहाराची प्रतीति होत नाहीं.” असें जें विमर्शिनीकारानीं म्हटालें आहे त्याचें खंडन झालें. तेव्हां वरील प्रकारानें समासोक्ति व व्यंग्यरूपक यांच्या विषयाची वाट्णी करणें शक्य असल्यानें, ‘तन्वी मनोहरा०’ या ठिकाणीं समासोक्ति आहे असें म्हणण्यांत राम नाहीं.
आतां त्यांनीं (म्ह० अलंकारसर्वस्वकारांनींच)
“औपम्य (साद्दश्य) पोटांत असल्यामुळेंही विशेषणांचें साम्य होऊं शकतें. उदा० “(दातांची प्रभा हेंच पुष्प, त्यानें युक्त, हात हीच कोवळीं पानें, त्यांनीं शोभणारी, उत्तम केस हाच भुंग्यांचा थवा जिच्यांत आहे अशी, सुंदर वेष धारण करणारीं, ती बालारूपी लता असा अर्थ न घेतां श्लोकांतील समासगत विशेषणें उपमितसमासगत मानून वरील श्लोकाचा असा अर्थ करावा :--- ) फुलाप्रमाणें असलेल्या दातांचय प्रभेनें युक्त, कोंवळ्या पानाप्रमाणें असलेल्या हातांनीं शोभणारी, भुंग्यांच्या थव्याप्रमाणें असलेल्या उत्तम केसांनीं युक्त अशी वेष धारण करणारी, ती मृगनयना आहे.)
ह्या श्लोकांत मृगनयना (नायिका) हिलाच केवळ लागू पडणार्य सुवेषत्व या विशेषणाच्या बळावर (प्रथम) दंतप्रभेसारखीं फुलें अशी (लतेला लागू पडेल असा अर्थ करणारी) समासाचा विग्रह करण्याची पद्धति सोडून, दंतप्रभा फुलासारखी, अशी उपमितसमासाच्या विग्रहाची पद्धति घेतल्यास प्रकृत नायिकारूपी अर्थाची सिद्धि होईल; नंतर समासवृत्तीहून दुसर्या (म्ह० व्यंनना या) वृत्तीचा आश्रय करून, ‘दंतप्रभासद्दशानि पुष्पाणि’ ही पूर्वीं टाकून दिलेली योजना पुन्हां घेतली तर, फुलें, पानें, भुंग्यांचा थवा इत्यादि उपमेयांनीं आक्षिप्त जी लगा तिची प्रतीति होईल. आइ असें झाल्यास नायिकेवर लताव्यवहाराचा आरोप करण्याची जरूर राहणार नाहीं. (तरीपण येथील विशेषणसाम्यामुळें ही औपम्यगर्भा समासोक्ति होऊ शकेल.) याचप्रमाणें, वरील श्लोकांत सुवेषा या पदाऐवजीं परीता हें पद घातलें तर, उपमेला साधक अथवा रूपकाला बाधक असें (निश्चित) प्रमाण मिळत नसल्यनें त्या दोन्ही अलंकारांचा संशायरूप (संदेह नांवाचा) संकर मानण्याचा निराळा मार्ग स्वीकारावा लागेल; आणि मग पूर्वीं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणें (नायिका या प्रकृत धर्मीवर लतेच्या व्यवहाराचा आरोप करून) लतेची प्रतीति होते, असें मानल्यास, प्रस्तुत श्लोकांत समासोक्तिच होईल. आतां अशा रीतीनें (दोनदां निराळ्या रीतीनें विग्रह करून) समासांत फरक होत असला व त्यामुळें दोन अर्थ (समासगत पदांचें अर्थ) निराळे होत असले तरी, समासांतील शब्द एकच असल्यानें, ते समास एकच आहेत असें मानून, श्लिष्ट विशेषणांनीं होणार्या समासोक्तींत ज्याप्रमाणें विशेषणाचें साम्य असतें. त्याप्रमाणें ह्या ठिकाणीं होणार्या समासोक्तींत ही समासरूपी विशेषणांचें साम्य आहे असें समजावें, पण प्रथम अथवा शेवटीं उपमेच्या ऐवजीं रूपक घेतलें (म्ह० विशेषणसमास मानून रूपकालंकार केला) आणि ‘दन्तप्रभा एव पुष्पाणि’ अशी योजना केली तर, हरिणेक्षणा या उपमेयाचें उपमान (लता ही) श्लोकांत नसल्यामुळें तिचा आक्षेप करावा लागेल; व तिचें नायिकेसीं तादाम्य केल्यानें एकदेशविवर्तिरूपक होऊन, त्यानेंच अप्रकृतार्थाची प्रतीति होत असल्यानें, त्या करतां येथें समासोक्ति मानण्याची गरज राहणार नाहीं.” हें त्यांचें (अलंकारसर्वस्वकारांचें) म्हणणेंही विचाराला टिकायचें नाहीं. कारण रूपक मानायेचे ऐवजीं दन्तप्रभा; पुष्पाणीव असा उपमित समास घेऊन व उपमागर्भत्व साधून सुद्धां पहिली योजना केल्यास, हरिणेक्षणा या अंशांत लता या उपमानाचा आक्षेप करावा लागेल; आणि मग ही एकदेशविवर्ति उपमा होईल. अशा रीतीनें या उपमेनें अप्रकृतार्थाच्या प्रतीतीचें काम भागत असल्यानें, समासोक्तीचा येथें प्रसंगच नाहीं. कारण तिची जरूर नाहीं. तुम्ही (म्ह० अलंकारसर्वस्वकार) म्हणाल, “उद्भटाचें मताप्रमाणें एकदेशविवर्ति उपमा ही त्यांना म्ह० उद्भटांना मान्य नाहीं; व दोन एकदेशविवर्ति उपमांचा संकरही त्यांना मान्य नाहीं. म्हणून आम्ही (एकदेशविवर्तिरूपक येथें आहे) असें म्हटलें आहे,” पण हें बरोबर नाहीं; कारण उद्भटानें स्वत:च :--- लागलेंच मागाहून - एकदेशविवर्तिउपमा व त्यांचा संकर या दोहोंची ही स्वीकार केला आहे.