महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ६७ ते ७०
वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.
भिन्ने वियत्सती शब्दभेदाद्वद्धेश्च भेदत: ॥
वाय्वादिष्वनुवृत्तंसन्नतु व्योमेति भेदधी: ॥६७॥
सत् आणि वियत् शब्दिं ॥ वसे निरंतर भेद बुद्धि ॥
ययाचें कारण आधिं ॥ परिस आतां ॥३४८॥
मुळीं शब्दीं पृथकपणा ॥ विपर्यास असे जाणा ॥
मग अर्थाचे ठिकाणा ॥ शोध घेऊं ॥३४९॥
विकल्पनेन जें सत् ॥ तया म्हणती वियत् ॥
कांकीं सत्ता प्रतिपादित ॥ न होय जेथ ॥३५०॥
जैशी पृथ्वीदिकांचे ठाईं ॥ सत्ता अस्तित्व वाटे पाहीं ॥
तैशी आकाशीं नाहीं ॥ बुद्धि ग्राहय ॥३५१॥
पृथ्वी आहे पाणी आहे ॥ तेज आहे वायु आहे ॥
तैशा परी आकाश नोहे ॥ ऐसें वाटतें बुद्धी ॥३५२॥
तीच जाणावी भेदबुद्धि ॥ राहतें वियत् सत् शब्दीं ॥
जैपा का नद नदी ॥ लिंग भेद ॥३५३॥
सद्वस्त्वधिकवृत्तित्वाद्धर्मि व्योम्नस्तु धर्मता ॥
धिया सत: पृथक्कारे ब्रूहि व्योम किपात्मकम् ॥६८॥
सद्वस्तुचेनी आधारें ॥ सकल ही सृष्टी वावरे ॥
येर्हवीं तया पृथक्कारें ॥ सत्ता नाहीं ॥३५४॥
म्हणोनी सदसत विशेषें ॥ बाकीचा किंचित अभास भासे ॥
सता धर्मित्व असे ॥ इतरां धर्मता ॥३५५॥
धर्म धर्मि वांचून ॥ न राहे एकही क्षण ॥
तैसेंची आकाश ही जाण ॥ कैसें राहतें ॥३५६॥
वादी - मृत्तिके वांचूनी घट नाहीं ॥ तेथ धर्मि मृतिकाच पाहीं ॥
परि तो निराळा रूपें राही ॥ तैसें आकाश कां नसावें ॥३५७॥
सि० - अरे सद्वस्तु वांचून ॥ बुद्धि काय करी आकाश वर्णन ॥
कोणतें तयाचें विलक्षण ॥ रूप असे ॥३५८॥
अवकाशात्मकं तच्चेदसत्तदिति चिंत्यताम् ॥
भिन्नं सतोऽसच्च नेति वक्षि चेव्द्याहतिस्तव ॥६९॥
जरी तूं अवकाशात्मक म्हणसी ॥ तरि तें सतचि विलासविसी ॥
सत् विलक्षण प्रतिपादिसी ॥ कोणे रिती ॥३५९॥
सत् विलक्षण असे असत् ॥ तेंचि म्हणसी तरी होतो व्यावात ॥
जन्मांध सूर्य प्रकाश पाहव ॥ हें का जैसें ॥३६०॥
आकाशाची करशी खोळी ॥ मृगजळ भरिसी आंजळी ॥
नाना गंधर्व नगराचे राउळीं ॥ बागुला बैसवीसी ॥३६१॥
सत् विलक्षण आकाश ॥ कोणे रीती करसी भास ॥
जीभ नाहीं मला म्हणतां दोष ॥ वदतांचि असे ॥३६२॥
भातीतिचेद्भातु नाम भूषणं मायिकस्य तत् ॥
यदसद्भासमानं तन्मिथ्या स्वप्नगजादिवत् ॥७०॥
वादी - मग असत्वाचे ठाईं ॥ भान तरी कैसें राही ॥
परि येथें राहतें हे प्रत्ययीं ॥ येतें आमुच्या ॥३६३॥
सि० - स्वप्नीं गजादि पहासी ॥ जागृतीं भानही असे तुजसी ॥
तरी का सत्यत्व आणसी तया लागीं ॥३६४॥
तें जैसें का असत् ॥ तैसेंची हें सकल जगत ॥
मायोपाधी भासत ॥ सत मिथ्यत्वें ॥३६५॥
माया हेंचि असे उचित ॥ मिथ्या सत्यत्वें दावीत ॥
हें सकल ही प्रतिपादित ॥ मागें केलें ॥३६६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 02, 2014
TOP