तुटलेले दुवे - आयुष्यांत कधी कधी क्षण अस...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
आयुष्यांत कधी कधी क्षण असे येतात जेव्हा मला
कोणाशी कसलाहि शब्द अगदी बोलूं नये वाटतें;
माझी प्रीतिलता, जरी तुज दिसे भाऊ तुझा त्रासला,
प्राशूनी अनुभूतिची कढत ही क्षारोदकें वाढते.
पुष्पें हीस नसोत आज परि तें आल्यावरी वैभव
देणें अन्य कुणा जिवास म्हणजे होऊल वेडेपण.
आहे ना अजि सावलीस हिरवा प्रच्छाय हा माण्डव ?
बैसूं सन्निध ही दुपारभर ये निश्शब्द दोघेजण !
काढूं आठवणी लहानपणच्या, चित्रें बघूं मागलीं,
द्दष्टी अन्धुक अश्रुपूर्ण वळवूं त्या रम्य भूताकडे;
डोळे ते मिटले. तशी हरपली मायाळु ती सावली,
दोघेही पडलों ऊन्हांत परि मी आहेंच तूतें गडे !
- छे छे ! ऐक नवीन भाव तुजला नेऊ दुरी ओढुनी,
होवो मङगल गे तुझें तरि, नसो माझें म्हणाया कुणी.
२० ऑक्टोबर १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP