अप्रकाशित कविता - नैराश्याचें गीत
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
आम्ही राहूं अंधारांत
नैराश्याचें गाणें गात.
अंधाराचें विणीत जाळें
अविरल अनुपम केवळ काळें
बसली होती युवती रजनी
जेव्हा गेलों मीही विजनीं.
बेपर्वा मी बघुनि द्वार
शिरें कराया त्यांत विहार
तेथे मजला हवें हवें तें
नांदत होतें नवें नवें तें.
होतां होतां जाळें झालें
द्वारहि त्याचें पूर्ण बुझालें
काय तयाची मजला चिन्ता
शिवुं न शके जी माझ्या चित्ता.
न लगे तारा, न लगे तारे,
लपले, मेले, ठारच सारे
तिथे न ठिणगी न काजवाही
चमके, चरके अंधारींही.
अंधाराचा पाहुन खेळ
नियामकांचा बसे न मेळ
तोंडामध्ये घालुन बोटें
स्वस्थचि बसती पडती खोटे.
नियमांची जो वाजवि टिमकी
आणिक घाली सर्वां धमकी
त्यासहि सुटला कम्प थरारा
बसतां याचा त्यास दरारा.
जादूपासुनि कुठे निवारा
न मिळे म्हणुनी हिंडत वारा --
करीत नैराश्यें आक्रोश,
प्रेमाने तो किति बिहोश.
कीटक चालवि किरकिर पिरपिर,
जणु अन्त:समयाची घरघर
मृत्यूची कल्पना जगातें
ये हा अनुदिन दावायातें.
काळे पडदे एकैकांवर
शिवून टाकी रजनी भरभर,
वरती खाली काळें काळें
त्या आवरणीं माझे चाळे.
येथें ध्वनि कर्कश दुमदुमती
त्या तालावर भुतेंहि घुमती;
अन्धाराचें मन्थन करिती
अक्षय कर्तव्यांतच रमती.
माहित नाही त्यांना आशा
खाणें त्यांचें होय निराशा;
कर्तव्यास्तव कर्तव्यांत
चूर अहा ते अन्धारांत.
--------
कोणि म्हणि मज, आशा ठेव,
दया करिल मग तुजवर देव
पुरे पुरे, हीं तुमची वचनें
आता कैचीं मजला रुचणें
अनुभवजन्य ज्ञान हवें मज,
रिते कोरडे बोल पुरे मज.
सुमारें १९१२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP