प्रसंग दहावा - भवयातना किंवा देहजाचणी
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
सांगतां बहात्तर कोठ्यांचे दुःख होरे । मज ऐसें थोडकें कल्पांतीं ना सरे । ऐकतां श्रोते होतील घाबरे । यालागीं सेव अवधारा ॥४०॥
बहात्तर कोठ्यांचीं दुःखें विशाळ । जेधवां उठे माझा पोटशूळ । तेधवां दुःखें करी तळमळ । कोणी वैद्य न पावती ॥४१॥
जेव्हां उठे हें ब्रह्मांड शिखर । तेव्हां घालमेल करीतसे थोर । कोसळती महा दुःखाचे डोंगर । नश्र्वरासी आई बा म्हणे ॥४२॥
अनेक दुःखें नि अष्टोत्तरसें व्याधी । भ्रम सन्निपात बरळेचि दे उपाधि । ऐशा पीडाकारें उडोनि जाय शुद्धि । ईश्र्वरीं आठव न पडे ॥४३॥
देह सोडतां पडे काळाची साई । वोळख मोडोनि स्त्रीस म्हणे आई बापास म्हणतसे जांवई । परि हरि गोपाळ न ये वाचे ॥४४॥
जाजावती भवरोगाच्या लहरी । चंद्रबिंब चढोनि लागे चंद्रीं । परी कोणी न म्हणे स्वहित करी । अविनाश आठवूंनियां ॥४५॥
मज मरों नेदीत मेलपणें । कोणी म्हणती सांग कोठें ठेवणें । एक म्हणती तुझीं बाळें लहानें । कोणी एकासी निरवी ॥४६॥
कोणी म्हणती ह्या वैद्यास दावा । कोणी म्हणती शीघ्र पंचाक्षरी बोलवा । एक म्हणती विष्ठेचा धूर द्यावा । यास झोटिंग लागला ॥४७॥
पापी दोषी पंचाक्षरी व्याहान । तो कण्हेराच्या फोंकेंवरी करी ताडण । लटकें आणून अंगीं देवपण । सांडणी भक्षीतसे ॥४८॥
देवॠषी घुमारे पंचाक्षरी । आपुलें स्वहित नेणती अघोरी । ते माझी दैवतें भूतें केंवीं दूरी । करूं शकतील ॥४९॥
माझ्या प्रालब्धें मज घडे भ्रमती । तेव्हां भट नानापरी छळती । परी ते नेणती आपली स्थिती आम्ही कवण ऐसी ॥५०॥
उमटे दुःख खांडुक पडसा । चिंताग्रस्त अवलोकी दाही दिशा । उदकावेगळा चरफडी मासा । ऐसा पीडत असे ॥५१॥
मनुष्यजन्मी तरी उपसार । दुःखें रडतां करिती जयजयकार । आनेत्र देहीं भोगितां घोरांदर । पीडा सांगतां न ये ॥५२॥
लक्षानुलक्ष पुण्याच्या जोडितां कोडी । तरीच मनुष्यजन्म लाधे आवडी । वरी भेटे जरी सद्गुरु बंद सोडी । सकळ भ्रमत्या छेदी ॥५३॥
प्रालब्धें देह धरितां तरुवर। ज्यास वाटे तो घाय घाली अपार । दुःख सांगतां न ये ना चुके वेरझार । पुढपुढती वेल वाढे ॥५४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP