माघ शुद्ध १
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
"अधर्मानें राज्य टिकत नसतें !"
माघ शु. १ या दिवशीं श्रीरामचंद्रांनीं राजधर्मास अनुसरुन व बिभीषणाची संमति घेऊन सामोपचाराचें शेवटचें बोलणें करण्यासाठीं अंगदास रावणाकडे पाठविलें. लंकेभोवतीं वेढा कायम केल्यावर रामचंद्र आपल्या सहकार्यांसह सुवेल पर्वतावर चढले व तेथून त्यांनीं लंकेचे निरीक्षण केलें. त्यानंतर प्रत्येक दरवाजावर कोटि कोटि वानर बसविले आणि स्वत: उत्तर दरवाजावर राहून अंगदास शिष्टाईसाठीं पाठविलें. रामचंद्रांनीं अंगदास सांगितलें. "अंगदा, मोठ्या धैर्यानें या लंकानगरींत तूं जा आणि बुद्धि नष्ट झालेल्या व मृत्यूच्या फेर्यांत सांपडलेल्या रावणाला माझा असा निरोप सांग कीं, ‘राक्षसाधमा, ज्या जोरावर सीतेला मायेने हरण करुन तूं माझा उपमर्द केलास, तें सामर्थ्य आतां दाखीव. त्या सीतेला मुक्त करुन तूं मला शरण आला नाहींस तर मी आपल्या तीक्ष्ण बाणांनीं तुझ्या लंकेतील सर्व राक्षसांचा नि:पात करीन. आणि हा तुझा धर्मात्मा बंधु बिभीषण यास लंकेचें सारें राज्य देऊन टाकीन. तूं स्वत: पापी आहेसच. पण तुझ्याभोंवती जमलेलें सर्व राक्षसहि मूर्ख आहेत. त्यांच्या ध्यानांत हें येत नाहीं कीं, अधर्मानें राज्याचें व राजाचें कधींहि कल्याण होत नसतें." रामचंद्रांचा निरोप घेऊन अंगद रावणाच्या सभेंत येऊन दाखल झाला. आणि स्वत:चे नांव सांगून त्यानें रामाचा निरोप रावणास जशाचा तसा निवेदन केला. मदांध झालेल्या रावणाला सद्बुद्धि कोठून सुचणार ? क्रोधाच्या आवेशांत अंगदास पकडण्यासाठीं त्यानें आपल्या प्रधानाला सूचना केली. चौघे राक्षस अंगदास कैद करण्यास धांवले. त्या चौघांनाहि घेऊन अंगदानें तेथून उड्डाण केलें. उडण्याच्या वेगानें ते राक्षस रावणाच्यासमोर धाडकन् खालीं आपटले. खुद्द रावणाच्या वाड्यावर चढून अंगदानें शिखरास एवढा मोठा धक्का दिला कीं, वाड्याच्या शिखराचा मोठा आवाज झाला; त्यानंतर अंगद रामरायापाशीं येऊन पोंचला. राजवाड्याचें शिखर कोसळलेलें पाहून मोठा अपशकुन झाला, असें वाटून रावणास अत्यंत दु:ख झालें.
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP