माघ शुद्ध ४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
श्रीगणपतीचा जन्मदिवस !
माघ शु. ४ हा दिवस श्रीगणपतीचा जन्मदिन म्हणून मानला जातो. मत्स्यपुराण, स्कंदपुराण ....... आदि ग्रंथातून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत. पार्वतीनें आपल्या अंगावरील उटण्याची मूर्ति बनवून ती सजीव केल्यावर गणपति निर्माण झाला; अदितीच्या पोटीं हा महोत्कटरुपानें जन्मास आला; पार्वती स्नान करीत असतां द्वाररक्षकांचे काम करणार्या गणपतीनें शंकरालाहि मज्जाव केला, त्यामुळे युद्ध झालें आणि शंकरांनी याचे मस्तक तोडलें, परंतु पार्वतीच्यासाठीं शंकरांनीं परत इंद्राच्या हत्तीचें मस्तक बसविलें. इत्यादि अनेक कथा पुराणग्रंथातूंन वर्णन केल्या आहेत. कित्येक ठिकाणी गणेशाच्या बालचरित्रांचेंहि वर्णन आढळतें. ‘गणानां त्वा गणपति’ हें ऋग्वेदांतील सूत्र गणपतीचें मानतात. महाभारतासारख्या अवाढव्य ग्रंथनिर्मितीच्या वेळीं गणेश हाच ‘लेखकु’ झाल्याचा उल्लेख आहे. सुमुख, एकदन्त, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश इत्यादी बारा नांवे याची प्रसिद्ध आहेत. गणपतीला गृत्समद, राजा वरेण्य व मुद्गल यांसारखे थोर भक्त मिळाले आहेत. ‘सुखकर्ता दु:खहर्ता - ’ म्हणून गणपती हें भारतीयांचें आराध्यदैवत बनलें आहे. शैव-वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक गणपतीची उपासना करतात. तामिल देशांत तंबिकाई अलवर म्हणजे बुद्धिवान गजानन आहे. तंजावर येथेंही प्रसिद्ध असें गणपतीचें देवालय आहे. त्रिचनापल्लीला उच्छि पिल्लेयर हें अत्यंत भव्य असें गणेश - मंदिर आहे. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य पंथ मान्यतेस पावला आहे. गणपतीचे अनेक अवतार मानले गेले आहेत. कृतयुगांत विनायक, त्रेतायुगांत मयूरेश्वर, द्वापरयुगांत गजानन, .... असें त्याचें वर्णन आढळतें. पेशव्यांचें आराध्य दैवत गणपति हेंच होतें. महाराष्ट्रांतील मोरगांव, थेऊर, लेण्याद्रि, सिद्धटेक आदि अष्टविनायकांचीं स्थानें प्रसिद्ध आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP