माघ शुद्ध १४
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
बापू गोखले यांचे निधन !
शके १७३९ च्या माघ शु. १४ रोजीं गोपाळ-अष्टी येथें इंग्रज-मराठे यांची लढाई होऊन मराठ्यांचे शेवटचे सेनापति बापू गोखले यांचें निधन झालें. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रज - मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत अष्टीच्या लढाईचें महत्त्व विशेष आहे. या लढाईमुळें दक्षिणेंतील मुख्य युद्ध संपलें, आणि बाजीराव वर्हाड चांद्याकडे निघून गेल्यामुळें अनायासें त्याचे प्रांत इंग्रजांस मिळाले. दोन-तीन महिने सारखी पळापळ चालली असल्यामुळें मराठी फौज कंटाळून गेली होती. बाजीरावाचा पाय कोठेंच स्थिर होत नव्हता. माघ शु. १४ रोजीं त्याचा मुक्काम अष्टी येथें असतांना स्मिथची फौज त्याचा पाठलाग करुन आली. बापू गोखले श्रीमंताजवळ होते. ते बोलले, "इंग्रज जवळ आले. आतां आपण पळूं नये" त्यानंतर लढण्याच्या निमित्तानें गोखले सामन्यास निघून गेले. "रणांगणीं स्वामीकार्यावर आल्यानेंच बहुमान आहे; या उपरीं चरणदर्शन होईल तर उत्तम, नाहींपेक्षां हेंच शेवटचें. " असें बोलून नमस्कार करुन इंग्रजांचे सन्मुख जाऊन उभे राहिले. इंग्रजांची पहिली तुकडी माघारी हटली. तें पाहून दुसर्या तुकडीनें गोखल्यावर चाल केली. गोखले यासं गोळी लागली. घोडा मोकळा झाला. गोखले गर्दीत मिसळून काटले गेले ..... गोविंदराव घोरपडे, आनंदराव बाबर वगैरे प्रमुख सरदार लढाईंत मारले गेले. इंग्रजांचेंहि पुष्कळ नुकसान झालें. खुद्द स्मिथच्या डोक्यास तरवारीची जखम झाली. बापू गोखल्यांना पिस्तूलाच्या तीन गोळ्या व तरवारीच्या दोन जखमा लागल्या.-" गोखले यांचें नांव नरहर गणेश असें असून त्यांचा जन्म शके १६९९ मध्यें झाला होता. गोखले हे स्वामीनिष्ठ सेनापति असून कोणत्याहि लढाईतून त्यांनी कधीं पाय काढला नाहीं. गणेश खिंडीच्या लढाईंत त्यांचा घोडा ठार झाला, तरीं ते पायउतार होऊन लढत होते. बापू प्रथम बदामीच्या लढाईंत स्वपराक्रमानें प्रसिद्ध झालें. त्यानंतर बर्याच मोहिमांतूण बापूंची कामगिरी प्रामुख्याची आहे.
- २० फेब्रुवारी १८१८
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP