माघ वद्य १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


योगी चांगदेव यांची समाधि !

शके १२१८ च्या माघ व. १३ रोजीं तेराव्या शतकांतील प्रसिद्ध योगी चांगदेव यांनीं पुणतांबें येथें समाधि घेतली. ज्ञानदेवकालीं प्रसिद्ध असणारे चांगदेव चांगा वटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. अनुपम लावण्य, सहजप्राप्त सिद्धि, क्षमाशीलता व दिव्य अंगकांति यावरुन लोकांना चांगदेव म्हणजे भूलोकावरील मरुद्‍गणच वाटत. शंकराची उपासना करुन त्यांनीं श्रृति, न्याय, व्याकरण, ज्योतिष, रसविद्या, धनुर्विद्या, गायनकला, इत्यादि विद्या व कला यांच्यांत नैपुण्य मिळविलें ! परंतु "चौदा विद्या चौसष्ठ कला । अवगत असल्या जरी सकला । परि चित्तीं नसली एक प्रेमकला । तरी त्या विकळा अवघ्याची" असा सिद्धांत असल्यामुळें त्यांचे चौदाशें वर्षांचें आयुष्य कोरडे चमत्कार करण्यांतच गेलें. ज्ञानेश्वरादि भावंडांचा लौकिक त्यांच्या कानावर आला तेव्हां चांगदेव अभिमानानें फुगून गेले. परंतु ज्ञानदेव चांगदेव यांची भेट झाल्यानंतर त्यांचा अहंकार उतरला. ‘चांगदेवपासष्टी’ त ज्ञानेश्वरांनीं त्यांना ‘तत्वमसि’ या महावाक्याचा बोध उत्तम रीतीनें केला आहे. पुढें चांगदेव मुक्ताबाईचे शिष्य झाले ! ज्ञानेश्वरादि भावंडांच्या सहवासाच्या परिणामानें चांगदेवांची अहंकारबाधा नाहींशी झाली. मुक्ताबाईनें आपल्या "चांगया सुताला" गाणें म्हटलें आहे,

"निर्गुणाचे डाहाळीं पाळणा लाविला ।
तेथें सुत पहुडला मुक्ताबाईची ॥
निज निज बाळा न करी पै आळी ।
अनाहत टाळी वाजतसे ॥

ज्ञानेश्वरांनीं समाधि घेतल्यानंतर सर्व संतमंडळ निराश झालें. सोपानदेवांनीं सर्वांच्या आधीं आपला देह ठेवला. गोदावरीच्या तीरावर पुणतांबें येथें आपणहि समाधि घ्यावी असा विचार चांगदेव करुं लागले; आणि त्याप्रमाणें माघ व. ११ ला हरिजागर, व. १२ चें कीर्तन आटोपल्यावर व. १३ रोजीं चांगदेवांनीं समाधि घेतली.

- २२ जानेवारी १२९७

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP