(१) "देखिलें ऐकिलें नव्हतें कोणीं"
शके १२०९ च्या माघ शु. ५ रोजीं प्रसिद्ध महाराष्ट्रीय संत ज्ञानदेव यांनीं पैठण येथे रेड्याकडून वेद बोलविला. संन्याशाचीं पोरें म्हणून ज्ञानेश्वरादि भावंडांचा फारच छ्ळ झाला. ब्रह्मवृंदांच्या निकालावरुन विठ्ठलपंत व रुक्मिणिबाई यांनीं आपलें देहविसर्जन केलें आणि पोरकीं झालेलीं हीं भावंडें शुद्धिपत्र मिळविण्यासाठीं पैठणची वाट चालूं लागलीं. आळंदीकर ब्राह्मणांनीं दिलेलें पत्र निवृत्तिनाथांनीं पैठनच्या ब्रह्मवृंदांसमोर ठेवून आपला सर्व वृत्तांत " होता तैसा स्पष्टा निवेदिला. " मोठमोठे वैदिक, शास्त्रज्ञ, विद्वान् ज्ञानदेवांच्या मुंजीसाठीं शास्त्रार्थ पाहू लागले. कोठेंहि आधार सांपडत नव्हता. हीं चार तेजस्वी अशीं ‘संन्याशाचीं मुलें’ सर्वाचीं अंत:करणें आपणांकडे ओढून घेत होतीं. ब्राह्मणांनीं निकाल सांगितला, "नाहीं प्रायश्चित्त उभयकुलभ्रष्ट." आणि भगवभक्तीचा आसरा घ्यावा असें सुचविण्यांत आलें. निर्णय ऐकून सर्व मुलें आनंदीच राहिलीं. कोणी तरी थट्टेनें मुलांना नांवें विचारली. तेव्हां त्यांनी आपल्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान,मुक्ता या शब्दांचे अर्थ सांगितले. लहा तोंडीं, हें ज्ञान पाहून ब्राह्मणांना हंसूं आलें. त्यांतील एक बोलला, "नावांत काय आहे ? तो समोरचा रेडा पहा. त्याचें नांव ज्ञानदेव आहे." त्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, "रेडियांत आम्हां कांही । भेद पाहतां किंचीत नाहीं । आत्मा व्यापक सर्वांदेहीं । भूतमात्रांसारिखा" आणि याची प्रचीति सर्वांना आली. रेड्याच्या पाठीवर ओढलेल्या कोरड्यांच्या वेदना ज्ञानदेवांना झाल्या. ब्रह्मवृंदांच्या आग्रहावरुन ज्ञानदेवांनीं आपला हात त्या रेड्याच्या मस्तकावर ठेविला. तो रेडा चारहि वेदांच्या ऋचा तोंडानें भराभर म्हणूं लागला. स्वर व वर्ण अचुकपणें बाहेर येत होते. ब्राह्मणवृंद लज्जित झाला. ज्ञानेश्वरादिकांची स्तुति करण्यास त्यांनीं आरंभ केला. ‘देखिलें ऐकिलें नव्हतें कोणीं । तें आजी प्रत्यक्ष देखिलें नयनीं’ अशी सर्वांची अवस्था होऊन त्यांनीं या मुलांना शुद्धिपत्राहि दिलें.
- जानेवारी १२८८
----------------------
(२) विजयनगर साम्राज्याचा अंत !
शके १४८६ च्या माघ शु. ५ ला प्रसिद्ध तालिकोतचें युद्ध होऊन दक्षिण भारतांतील बलाढ्य असें विजयनगरचेम हिंदु राज्य नष्ट झालें. देवगिरीच्या यादवांचीं राज्य बुडाल्यावर दक्षिणेंत शंभर वर्षे बजबजपुरी माजली होती. गोदा, कृष्णाकांठावर इस्लामी लाटेस तोंद देणारें कोणी नाहीं असें पाहून तुंगभद्राकांठचे हिंदु लोक या उद्योगास लागले. सार्या दक्षिण प्रांतांत इस्लामी सत्ता प्रबळ होणार असा रंग दिसूं लागला. धर्म नष्ट झाला, पारतंत्र्य आलें, मंदिरें जमीनदोस्त झालीं. अशा कठीण समयीं तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर विजयनगर शहरीं (सुग्रीवाच्या किष्किंधा नगरीच्या जागीं) विद्यारण्य ऊर्फ माधवाचार्य यांच्या साहाय्यानें हरिहर आणि बुक्क या बंधूंनीं एका प्रचंड हिंदु साम्राज्याची मुहूर्तमेढ शके १२५८ मध्यें रोविली. बुक्क, दुसरा हरिहर, नृसिंहराय,कृष्णदेवराय, अच्युतराय, सदाशिवराय, आदि अनेक पराक्रमी राजे विजयनगरच्या गादीवर होऊन गेले. विजयनगएवढें ऐश्वर्यशाली साम्राज्य त्या वेळीं दुसरें नव्हतें. परंतु शेवटीं निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा व बेरीदशहा या चौघा मुसलमान बादशहांनीं रामराजास ठार मारुन विजयनगरचें हिंदु राज्य धुळीस मिळविलें. कृष्णेच्या कांठी रकसगी व तंगडगी या दोन खेड्यांत रामराजाच्या सैन्याचा तळ होता. त्यावरुन या युद्धास ‘राक्षसतागडी’ चें युद्धहि म्हणतात. माघ शु. ५ ला दोनहि फौजा युद्धास सज्ज झाल्या. रामराजा स्वत: पालखींतून सर्वांना उत्तेजन देत होता. बराच वेळ अगदीं कडाकडीचें युद्ध झाल्यावर हुसेन निजामशहा फळी फोडून रामराजाच्या अंगावर धांवला. सत्तर वर्षांचा रामराजा पालखींत चढत असतांच निजामशहाचा एक मस्त हत्ती त्याच्या अंगावर धांवला. भोई पालखी टाकून पळाले. रुमीखान नांवाच्या अधिकार्यानें रामराजास धरुन निजामशहाकडे नेलें. निजामशहानें त्याचें शिर कापून तें भाल्यास लावलें व शत्रूस कळण्यासाठीं चोहोंकडे फिरविलें ! हिंदु सैन्याची धूळधाण उडाली. " करनाटकी लस्केर तमाम चिंदीचोल जहालें. कुल लस्कर मिलोन विजयनगरासी गेलें -"
- २३ जानेवारी १५६५
---------------------------
(३) शहाजी राजे यांचें निधन !
शके १५८४ च्या माघ शु. ५ रोजीं शिवरायाचे वडील प्रसिद्ध ‘राज्यसंकल्पक’ शहाजी राजे यांचें निधन झालें. बेदनूरच्या स्वारींत असतांना तुंगभद्रेच्या तीरीं बसवापट्टणजवळ होडिकेरी येथें त्यांचा मुक्काम होता. - " या ठिकाणीं अनेक श्वापदें उठलीं. राजास शिकार करावयाची इच्छा होऊन घोड्यावर स्वार होऊन हरणाचे पाठीस लागले. ईश्वरेच्छा त्यायोगें घोड्याचा पाव भंडोळींत अडकून, घोडा व राजे एकवच्छेदें पडले, ते गतप्राण झाले. मागाहून लोकमाणसें आलीं. त्यांनीं एकोजी राजांस तेथें आणविलें. एकोजी राजे यांनी उत्तर क्रिया सांग केली. शिवाजी सुरतेच्या स्वारीहून परत आल्यावर वृत्त कळून जिजाबाई सुद्धां शोकसमुद्रीं बुडून बहुत विलाप केला." शहाजी राजे मोठे धाडसी, कल्पक, व विपन्नावस्थेत न डगमगणारे होते. कर्नाटकांत मराठ्यांचा प्रवेश प्रथम शहाजीनें करविला. ब्राह्मण, क्षत्रिय, कारागीर यांची महाराष्ट्रीय संस्कृति दक्षिणेंत अद्यापि दिसून येते. सन १६३६ सालापर्यंत निजामशाहीचा कारभार पाहिल्यानंतर त्यांची दृष्टि कर्नाटकाकडे वळली. मोंगल नर्मदेअलीकडे येऊं नयेत म्हणून शहाजीनें कमालीचे प्रयत्न केले. शहाजहानच्या दोन लाख फौजेस सुद्धा त्यानें दाद दिली नाहीं. तत्कालीन व्यक्तींत राष्ट्रीय स्वत्व दिमाखानें दाखवणारा हाच एकटा हिंदु सत्ताधीश दक्षिणेंत होता. आपण हिंदु असून मुसलमानी सत्तेची वृद्धि करण्यास आपला पराक्रम कारणीभूत होतो याची जाणीव शहाजीस कष्टी करीत होती. पूर्वपरंपरेची, प्राचीन संस्कृतीची व संस्कृत विद्येची आवड शहाजीच्या ठिकाणीं होती. तो विद्याकलांचा भोक्ता होता. कवींना, शिल्पज्ञांना बंगलोर, तंजावरास जो आश्रय मिळाला तो महाराष्ट्रांत मिळाला नाहीं. शहाजीनें निर्माण केलेली प्राचीन संस्कृतीची ही आवड आजहि त्या प्रांतांतून दिसून येते. विजयनगरचा शेवटचा राजा श्रीरंगराय याबद्दल शहाजीस पराकाष्ठेचा आदर होता; त्याचा बचाव करण्याची त्यानें शिकस्त केली.
- २३ जानेवारी १६६४