माघ वद्य ७

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"संभाजी राजांस जिवंतच धरुन नेलें !"

शके १६१० च्या माघ व. ७ रोजीं ‘संभाजी राजे व कवि कलश खेळणाहून रायगडास जावयास संगमेश्वरास आले असतां सेक निजाम कोल्हापुरीहून दौड करुन येऊन उभयतांस जीवंतच धरुन नेलें.’ शेख निजाम नांवाचा एक कुत्बशाहींतील सरदार औरंगजेबास येऊन मिळाला होता. बादशहानें त्याला सहा हजारांची मनसब व मुकर्रबखान किताब देऊन त्याचा गौरव केला. त्याला कोल्हापूर प्रांताची माहिती चांगली असल्यामुळें पन्हाळा किल्ल्यास वेढा घालून संभाजीस पकडण्याची कामगिरी बादशहानें याचेवर सोपविली. औरंगजेबानें संभाजीचा पाडाव करण्याचे फार प्रयत्न केले होते. सर्वत्र गुप्त हेर पसरलेले होते; त्यानीं येऊन शेख निजामास वर्दी दिली कीं, संभाजी संगमेश्वर येथें ऐषारामांत मग्न आहे. लागलीच मुकर्रबखानानें जय्यत तयारी केली. दोन हजार स्वार व एक हजार पायदळ एवढ्या सैन्यानिशीं तो संभाजीस पकडण्यास निघाला. अंबा घाटांत त्याच्या सैन्यास फारच त्रास सहन करावा लागला, परंतु नेटानें त्यानें संगमेश्वर गांठून संभाजीवर हल्ला केला. कवि कलशानें त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हातास जखम झाल्यामुळें तो मागें फिरला; आणि लोकहि सर्व भराभर पळून गेले. खानाने संभाजीच्या राहत्या घरास वेढा दिला. दुर्व्यसनानें गोगलगाय झालेला पराक्रमी सिंह, संभाजी,कवि कलशाबरोबर तळघराच्या काळोखांत लपून बसला ! शेख निजामचा मुलगा इख्लासखान याने अरुंद पायर्‍यांवरुन तळघरांत प्रवेश केला; आणि संभाजी व कलशा यांना पकडून वर आणिलें. मुकर्रबखान बाहेर होताच. त्यानें त्या दोघांना हत्तीवर बांधलें. घरांत इतर माणसें सांपडलीं त्यांना कैद केलें व सर्वांना घेऊन तो बादशहाकडे निघाला. यासंबंधी असा उल्लेख सांपडतो :- "मोंगलानें कबजीसह हस्तगत करुन नेलें. ते समयीं वाडा जाळिला व गांवांतील देवळे फोडिलीं. देव बाटविले. याप्रमाणें महार्णव जालें !" याच वेळी गर्दीत म्हाळोजी घोरपडे ठार झाला. आणि संताजी वगैरे त्याचे तिघे पुत्र रायगडाकडे गेले.

- १ फेब्रुवारी १६८९

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP