माघ शुद्ध ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
(१) राणा प्रतापसिंहांचें निधन !
शके १५१९ च्या माघ शु. ११ रोजीं उदेपूरचा पराक्रमी, स्वातंत्र्याभिमानीं राणा प्रतापसिंह याचें निधन झालें. राणा प्रतापसिंहाची चितोड घेण्याची गर्जना अकबराच्या कानीं गेलीच होती. मानसिंग व स्वत:चा पुत्र सेलीम यांबरोबर फौज देऊन अकबरानें युद्धाची सिद्धता केली. हळदीघाटाच्या खिंडींत दोनहि सैन्यांची गांठ पडली. सेलीम या युद्धांत ठारव व्हावयाचा; पण थोडक्यांत बचावला. युद्ध करीत असतां प्रतापसिंहास सात जखमा झाल्या होत्या. त्याचा विश्वासू घोडा चेतक त्याला धीर देत होता. पुढील पावसाळ्यांत हळदीघाटाच्या वाटेवर सेलीमनें प्रतापाच्या सैन्याची भयंकर कत्तल केली. प्रतापवर बिकट प्रसंग आला. त्याचें दारिद्र्य व दुर्दैव यांनी त्याला वेढलें. हा उदेपूरचा राणा रानांवनांतून दबून राहूं लागला. त्याच्या मुलांचे फार हाल झाले. हालअपेष्टा सोशीत असतांना प्रतापानें पुन्हां एकदां युद्धाची सिद्धता केली. भराभर बत्तीस किल्ले त्यानें परत घेतले. मोंगल सेना त्रस्त झाली. चितोडखेरीज बहुतेक मेवाड प्रतापनें परत जिंकून घेतला. पण चितोडगड मिळविण्याची त्याची इच्छा तृप्त झाली नाहीं. या चिंतेनेंच त्याला दुखणें लागून तो खंगून गेला. राणा मृत्यूशय्येवर सारखा तळमळत असे. त्याच्या यातना एका सरदारास पहावेनात म्हणून तो म्हणाला, "महाराण्याच्या जीवास कोणते क्लेश होत आहेत ? कोणती इच्छा आहे ?" राणा बोलला, "माझा देश माझ्या पश्चात् परकीयांच्या ताब्यांत जाउं नये. मरतांना प्रताप कोणाची काळजी करीत होता ? बायका-मुलांची ? त्यांच्या सुखाची कीं देशाची ? .... त्याच्या मुखांत शेवटी वैयक्तिक मोक्षास अनुसरुन ईशनाम आलें. दु:ख, दारिद्र्य आणि वनवास यांना सबंध जीवितभर निग्रहानें तोंड देणारा राणा प्रताप ‘चितोड चितोड’ करीत इहलोक सोडून गेला. चावंड येथें राण्यानें देह ठेवल्यावर त्याचा अग्निसंस्कार तेथून दीड मैलावर बंडोलच्या एका ओढ्याकांठीं झाला.
- १९ जानेवारी १५९७
--------------------------
(२) वासुदेव बळवंतांचे निधन !
शके १८०४ माघ शु. ११ रोजीं महाराष्ट्रांतील पहिले क्रांतिकारक बासुदेव बळवंत फडके यांचें निधन एडन येथील कारागृहांत झालें. भारतीय स्वातंत्र्यासाठीं लढणार्या या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील तुरुंगांत डांबून रहावें लागलें होतें. त्यांचा मुक्त आत्मा रोगानीं जर्जर झालेल्या शरीरांत तडफड करीत होता. दोन तीन वर्षापूर्वी तुरुंगांतून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनीं केला असल्यामुळें सरकारनें त्यांच्यावर अधिक बंधनें लादलीं होतीं. जीवन अधिक त्रासाचें व कष्टाचें झालें होतें. त्यांचें मन आणि शरीर खंगून गेल्यामुळें उत्साह पार मावळून गेला होता. दुर्धर अशा क्षयरोगानें त्यांना गांठलें. तेथील अधिकारी त्या वेळीं फलटण येथील डॉ. बर्वे हे होते. ओळखीचे, जवळचे व थोड्या मायेचे असे एकच गृहस्थ म्हणजे बर्वे डॉक्टर. वासुदेव बळवंतांना आतां कोठलीहि आशा उरली नव्हती. एका म्रुत्यूचीच मार्गप्रतीक्षा त्यांनीं चालविली होती. घरदार शेंकडों मैलांवर दूर होतें. वडीलबंधु, पत्नी, मेहुणे इत्यादि सर्व नागलग माणसें त्यांच्या गांवीं - शिरढोण व पुणें येथें राहिलीं होती. मृत्यूची वाटचाल करणारे वासुदेव बळवंत इंग्रज सरकारवर मनांतून चरफडत होते. आपल्या मृत्यूनंतरहि जुलमी इंग्रज सत्तेस सुख मिळूं नये यासाठीं जणुं देवाची प्रार्थना त्यांनीं आरंभली होती. माघ शु. ११ या दिवशीं त्यांच्या अंगांतील ताप वाढला आणि अखेरची घटका जवळ आली. सायंकाळीं चार साडेचार वाजतां त्यांचें निधन झालें. देशासाठीं प्राणार्पण करणार्या क्रांतिकारांत फडके यांचें स्थान पहिलें आहे. "दधिची ऋषींनीं आपल्या अस्थीहि देवासाठी दिल्या; मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठीं कां देऊं नये ? " असे यांचे उद्गार आहेत. शिरढोण येथील यांच्या स्मारकस्तंभापुढें भाषण करतांना स्वा. वी. सावरकरांनी उद्गार काढले, "आमच्या हृदयांतील स्वातंत्र्यकांक्षेची ज्योत ही वासुदेव बळवंतांच्या हृदयांतील ज्योतीनेंच उत्स्फूर्त झाली आहे ....
- १७ जानेवारी १८८३
-------------------------
(३) अण्णासाहेब पटवर्धन यांचें निधन !
शके १८३८ च्या माघ शु. ११ रोजीं महाराष्ट्रांतील राजकारणीवृत्तीचे प्रसिद्ध साधुपुरुष महर्षि विनायक रामचंद्र ऊर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचें निधन झालें. कोंकणांतील आरमाराचे अधिपति धुळप यांच्या आश्रयास पटवर्धनांचे घराणें होतें. रामचंद्रपंत पटवर्धन प्रथम पुण्यास आले. गुंडांच्या गणपतीच्या कृपेमुळें अण्णासाहेबांचा जन्म शके १७६९ च्या वैशाख व. ४ रोजीं झाला, म्हणून त्यांचें नांव विनायक असें ठेवण्यांत आलें. बी.ए. झाल्यनंतर यांनीं मुंबईस मेडिकल कॉलेज व लॉ क्लास या दोनहि ठिकाणीं अभ्यासास प्रारंभ केला. दोनहि परीक्षा एकदम देतां येत नसल्यानें हे एलएल्. बी. झाले. परंतु डॉक्टरीची एल्.एम्. अँण्ड एस्. ही पदवी मात्र यांना मिळाली नाहीं. अण्णासाहेबांना आयुर्वेदाचें ज्ञान उत्तम होतें. परंतु वैद्यकीवर पैसा मिळवावयाचा नाहीं अशी यांची श्रद्धा असल्यामुळें यांनी वैद्यकीवर एक पैहि मिळविली नाहीं. मुंबईस यांचें वास्तव्य बारा वर्षापर्यंत होतें. त्या वेळीं यांनी काचकारखाना वगैरे औद्योगिक क्षेत्रांत लक्ष घातलें. औद्योगिक व राजकीय उलाढाली मोठ्या प्रमाणावर करण्यासाठीं यांना आर्थिक साह्याची आवश्यकता वाटूं लागली. त्यासाठीं निजामच्या ताब्यांत गेलेला वर्हाड प्रांत, फ्रेंच बँकेतून मोठी रक्कम काढून हैद्राबादचे दिवाण सर सालजंग यांच्या सहकार्यानें विकत घेण्याचें यांनीं ठरविलें. परंतु थोड्याच दिवसांत सालरजंग निधन पावले व अण्णासाहेबांचा सर्व डाव फसून ते गोत्यांतच आले. त्यानंतर यांची वृत्ति उदासिन बनली. आळंदी येथील नरसिंहसरस्वती स्वामींचें शिष्यत्व यांनीं स्वीकारिलें व आपलें सर्व आयुष्य हे सार्वजनिक कार्यांत खर्च करु लागले. कायदेशीर सल्लामसलत देणें, नगरपालिकेच्या निवडणुका लढविणें, फिर्यादी लिहून देणें, मोफत औषधोपचार करणें इत्यादि कार्यात यांचें जीवित व्यतीत होऊं लागलें. लो० टिळकांच्यावर यांची मोठी भक्ति होती. अण्णासाहेब अत्यंत धार्मिक, उत्कृष्ट आचारशील आणि राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्यावादी होते. हे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या मासिकाचे व नंतर ‘वैद्यसुधा’ मासिकाचे संपादक होते.
- २ फेब्रुवारी १९१७
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP