माघ शुद्ध १५
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
बंका महाराची समाधि !
शके १२४० च्या माघ शु. १५ रोजीं प्रसिद्ध भगवद्भक्त चोखामेळा याच्या बायकोचा भाऊ बंका महार हा समादिस्थ झाला. तेराव्या शतकांतील नामदेवांच्या कुटुंबाप्रमाणेंच चोखामेळ्याचें कुटुंब भगवद्भक्त व कवि म्हणून प्रसिद्ध आहे. चोखोबाची पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळाबाई, मुलगा कर्ममेळा, मेहुणा बंका हे सारे विष्णुभक्त असून त्यांचे अभंग प्रसिद्ध आहेत. या वेळीं महाराष्ट्रांत समाजांत एक क्रांतिकार्य सुरु होतें. पंढरपूरांत चंद्रभागेच्या तीरावर लोकविलक्षण धर्मकार्य चालू झालेलें होतें. त्यापूर्वी - " परमेश्वराच्या दाराची कवाडें युगानुयुगें बंद राहिलीं होतीं. मी सर्वांचाच आहें, ही श्रीकृष्णाची मंगल घोषणा त्रैवर्णिकाच्या जपणुकीच्या कुंद हवेंत लुप्त झाली होती, धर्माच्या वाहत्या पाण्याला खांडवे पडले होते, परमेश्वराच्या भक्तीची अखिल समाजाला प्राप्त झालेली समान अधिष्ठानाची भूमि आकसून गेली होती, निर्मल तत्त्वज्ञानाचें तेज मावळल्यासारखें झालें होतें. मानवी जीवनाच्या विशाल पंचमहाभूतांची प्रकृतिच क्षीण झाली होती. जग आंबून गेलें होतें, जिणें रुग्ण झालें होतें, मन जरत्करु बनलें होतें - (श्री. म. माटे) -" आणि याच योग्य वेळीं नामदेव-ज्ञानदेव समतेचा संदेश सर्वत्र पसरवीत होते.
"तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ।
जाती तंवाचि वेगळालिया । जंव व पवती मातें ।
मग जाती - व्यक्ति पदे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनलें ।
जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥"
अशी गर्जना ज्ञानदेवांनीं केली. चोखोबाच्या कुटुंबियांनीं केलेले अभंग अतिशय गोड आहेत. बंकाचा गुरु चोखोबा स्वत:च होते. एका अभंगांत बंकानें आपली गुरुपरंपरा सांगून शेवटीं म्हटलें आहे -
"नामदेवें हात चोखयाचे शिरीं । विठ्ठल तीं अक्षरें उपदेशिलीं
बंका म्हणे माझी चोखा गुरु माउली । तियेचे पायीं लोटांगण ।-"
- ७ जानेवारी १३१९
N/A
References : N/A
Last Updated : October 04, 2018
TOP