माघ शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.



(१) गोपाळराव पटवर्धनांचें निधन !

शके १६९२ च्या माघ शु. २ रोजीं पेशवाईतील साडेतीन रावांपैकी पहिले राव गोपाळ गोविंद पटवर्धन, मिरजकर याचें निधन झालें. गोपाळराव पटवर्धन, मुरारराव घोरपडे, भवानराव प्रतिनिधि व अर्धाराव माधवराव पेशवे मिळून साडेतीन राव त्या वेळीं विख्यात होते. सन १७४० मध्यें गोपाळरावांना शिलेदारी मिळाल्यावर यांनीं गेंड्याच्या लढाईंत चांगलाच पराक्रम केला. यांची कर्नाटकांतील कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. तिकडील बहुतेक सर्व स्वार्‍यांत यांनीं पराक्रम केला आहे. हैदरशीं चाललेल्या युद्धाच्या वेळीं माधवराव पेशव्यांची सारी भिस्त यांच्यावरच होती. यांनीं हैदराशीं अनेक वेळां युद्धें करुन त्याचा पराभव केला. परंतु पुढें या सर्व कामगिरीमुळें त्यांच्या शरीरावर ताण बसला आणि त्यांना जलोदराची व्यथा लागली. त्यामुळें स्वारी सोडून यांना मिरजेस यावें लागलें. तिसर्‍याच दिवशीं म्हणजे माघ शु. २ रोजीं गोपाळरावांचा अंत झाला. तेव्हां " त्रिंबकराव गोपाळरावांकरितां फार श्रमी झाले. आम्हां सर्व ब्राह्मणांमध्यें केवळ मुकुटमणि होते. महत्त्व कायम राहून गेलें. मुरारराव घोरपडेहि फार श्रमी झाले." गोपाळराव जसे शूर तसे स्पष्ट वक्ते व व्यवहारांत चोख होते. ते शरिरानें सडपातळ व मध्यम उंचीचे असून स्वभावानें आनंदी व उत्साही होते. स्वभाव मोठा मानी असून सर्व संस्थानिकांना यांचा मोठाच दरारा वाटे. हैदरहि त्यांना मोठा मान देई."गोपाळरावासारखे पुण्यश्लोक कोणी नाहीं. आमची अदृष्टें खोटीं म्हणून ते नाहिसे झाले. डेरा थोरला मुदपाकाचा व संध्येची राहुटी, साच्या वेळ मस्कर्‍या हें नजरेंत येतें, तेव्हा परम दु:ख होतें. वहिनीस आकाशीची कुर्‍हाड पडली. सारें क्षणभंगुर " असा मजकूर यांच्या संबंधांनें सांपडतो. गोपाळरावांइतकी कर्नाटकांतील माहिती इतर कोणालाहि नव्हती. पटवर्धनांच्या सबंध घराण्याचा इतिहासच मोठा ओजस्वी आहे. त्याचे शौर्य, धाडस, स्वार्थत्याग, वगैरे गुणांचा राष्ट्रास मोठाच उपयोग झालेला आहे. या घराण्यानें देशाची सेवा उज्जवलपणें केली आहे.

-  १७ जानेवारी १७७१
====
(२) उमाजी नाईक फांसावर !

शके १७५३ च्या माघ शु. २ रोजीं जेजुरीच्या खंडोबाचा प्रसिद्ध भक्त आणि विख्यात बंडखोर रामोशी उमाजी नाईक हा फांशी गेला. शके १७१३ मध्यें पुरंदरशेजारच्या भिवंडी गांवी उमाजीचा जन्म झाला. सन १८०२ च्या वसईच्या तहानंतर पेशवे आणि रामोशी मंडळी यांचे बिनसलें. रामोशांचीं वतनें जप्त झालीं. त्या वेळेपासून यानें लुटालूट करण्यास भोगिल्या होत्या. सन १८२१ मध्यें पुणें प्रातांत यानें फारच धुमाकूळ घातला. याचा बंधु सत्तु जेजुरीच्या यात्रेंत पकडला जात असतां उमाजीनें दोन पोलिसांनाच ठार करुन इंग्रजांविरुद्ध बंड उभारलें. आपला संच जमवून यानें पुण्याच्या सरकारी तिजोरीवर हल्ला केला व सहा हजार दोनशें रुपये लांबविले. सत्तु वारल्यावर हाच टोळीचा नायक झाला. इंग्रज सरकारनें याला पकडण्यासाठीं फारच प्रयत्न केले. ‘पूना हॉर्स’ या फौजेच्या मुख्य अधिकार्‍याला उमाजीवर पाठविलें पण कांहीं उपयोग झाला नाहीं. पोलिसांचीं मुंडकीं कापून तीं तो गव्हर्नराकडे पाठवीत असे. वतनें परत देण्याच्या अटीवर सरकारशीं याचें सख्य झालें. आणि उमाजीचा उपयोग सरकारला गुन्हे पकडण्याच्या कामीं होऊं लागला. परंतु पुढें याचा कार्यक्रम सर्व बदलून हा पुन: बंडखोर झाला. खंडोबाचें दर्शन घेऊन यानें आपल्या साथीदारांसह पुणे, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक, भोर या प्रांतातून दंगल घडवून दिली. साडेतीनशें लोक याच्या टोळींत होते. सरकार पुन्हा याला पकडण्याच्या कामगिरीस लागलें. नाकेबंदीमुळे अन्नवस्त्र मिळेनासें झाल्यावर याचे साथीदार याला सोडून जाऊं लागलें. कांही फितुर होऊन सरकारला मिळाले. पांच हजारांचे बक्षीस सरकारनें लाविलें होतें. तें दहा हजारापर्यंत वाढल्यावर याच टोळींतील नाना व काळू यांनी उमाजीला भोर संस्थानच्या पोलिसांच्या स्वाधीन केलें. शेवटी माघ शु. २ ला पुणे येथें दोघां साथीदारांसह याला फांशी देण्यांत आलें. उमाजी मोठा शूर व मनाचा उदार होता.

- ३ फ्रेब्रुवारी १८३२

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP