माघ वद्य ११
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
माधवराव पेशवे यांचा जन्म !
शके १६६६ च्या माघ व. ११ रोजीं पराक्रमानें, कर्तबगारीनें आणि तेजानें श्रेष्ठ असलेले पेशवे थोरले माधवराव यांचा जन्म झाला. हे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे व गोपिकाबाई यांचे दुसरे पुत्र. पानिपतसारख्या भयंकर राष्ट्रीय आपत्तींहून मराठेशाहीस सावरुन धरण्यासाठीं माधवरावांनीं आटोकाट प्रयत्न केले. "श्रीशिवाजीमहाराजांनीं मराठी स्वातंत्र्याचा झेंडा उभारल्यानंतर त्या राज्याचा विस्तार, वैभव व दरारा वाढवून मराठ्यांचें नांव हिंदुस्थानच्या इतिहासांत चिरस्मरणीय करुन ठेवण्याकरितां ज्या थोर महाराष्ट्रीय पुरुषांनीं जिवापाड मेहनत केली व प्रसंगीं आपले प्राणहि वेंचले, त्या थोर पुरुषांच्या मालिकेंत माधवरावांचे स्थान बरेंच वरचें आहे. " कर्नाटकांत झालेल्या चारहि स्वार्यांत माधवराव स्वत: हजर होते. निजामचाहि बंदोबस्त करण्याची कामगिरी यांनीं केली. पानपतावर मराठ्यांची झालेली बदनामी धुऊन काढण्यासाठीं रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले या दोन सेनानायकांना माधवरावांनीं उत्तरेंत पाठवून दिलें; आणि त्यांनींहि मोठेंच शौर्य गाजवून दिल्लीस परत मराठ्यांचें निशाण लावलें ! हें ऐकून माधवरावांना एवढा हर्ष झाला कीं, त्या दोन वीरांना सोन्याचांदीचीं फुलें उधळूनच पुण्यास आणावें अशी आज्ञा त्यांनीं केली. माधवराव मोठे पराक्रमी आणि कर्तबगार होते. "यवनास जबरेंत आणून पुरतें पारिपत्य करुन देवब्राह्मणांची स्थापना करावी, संस्थानें सोडवावीं, हाच भाव आहे." या वाक्यांत माधवरावांच्या जीविताचें सार आहे. "प्रजावास्तल्य, मनुष्यतत्त्वाची पारख, इभ्रत, शौर्य, कारस्थानीपणा वगैरे जें जें कांही राजाला अवश्य पाहिजे तें तें माधवरावांच्या अंगीं एकवटलें होतें. त्यांच्या अंगी बाळाजी विश्वनाथाप्रमाणें व बाळाजी बाजीरावाप्रमाणें कारस्थानपटुत्व होतें, बाजीरावाप्रमाणें शूरत्व व धाडस होतें. शिवाय मनुष्याची पारख करण्याच्या कामांत तर त्यांची कमाल होती. तसल्या अल्पवयांत जीं जीं मनुष्यें त्यांनी निवडलीं त्यांतील एकहि टाकाऊ निघाला नाहीं !"
- १६ फेब्रुवारी १७४५
N/A
References : N/A
Last Updated : October 05, 2018
TOP