माघ शुद्ध १२

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शिवरायांचा कोंकणांत अमल !

शके १५८३ च्या माघ शु. १२ रोजीं श्रीशिवाजीमहाराज यांनीं तळकोंकण काबीज करुन तेथें आपला अमल बसविला. विजापूर दरबारनें अफझलखानास आपल्यावर पाठविलें याबद्दल शिवाजीच्या मनांत राग होता. त्याचा सूड घेण्यासाठीं कल्याणपासूनच्या दक्षिण किनार्‍यावर त्यांनीं आपलें लक्ष वेधवून घेतलें. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापार्‍यांचाहि बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतु शिवाजीचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादि धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्दीस मदत करीत. तेव्हां त्यांचीं हीं ठाणें उठवणें अगत्याचें होतें. म्हणून शिवाजीची स्वारी आतां या उद्योगास लागली. कोंकणातील श्रीमंत शहरें व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणें हस्तगत केलीं. पुढें शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणार्‍या सहा इंग्रजांना त्यानें कैदेंत ठेविलें. सर्व प्रदेश ताब्यांत आल्यावर प्रचितगड, पालगड, मंडनगड हे किल्ले त्यांनीं नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचें वर्चस्व प्रस्थापित होऊन ‘तळकोंकण महाराजांस अर्जानी झालें.’ कोंकण हस्तगत झाल्यावर शिवाजीची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरांत अफझलखानाचीं तीन जहाजें होतीं. तीं घेऊन तेथील अमलदार राजापुरास पळून गेला. खानाचीं तीन जहाजें इंग्रजांच्या आश्रयास गेलीं. इंग्रज सुखासुखी जहाजें शिवाजीकडे देत नव्हते. अफजलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवाजीचें नांव ऐकतांच भीतीनें वखारीचा मुख्य रेव्हिंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रांतून पळून गेला. पुढें रँडॉल्फ टेलर, रिचर्ड टेलर, गिफर्ड इत्यादि इंग्रजांनीं कांहीं आगळीक केली म्हणून शिवाजीनें त्यांना कैदेंत ठेविलें. शिवाजीच्या अधिकार्‍यानें इंग्रजांना कळविलें, "महाराजांस सिद्दीचे ताब्यांतून दंडा राजापुरी घ्यावयाची आहे, त्या कामीं तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठें बक्षिस देऊं, नाहीं तर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाहीं."

- २१ जानेवारी १६६२

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP